मुंबई : रिफायनरी प्रकल्पासाठी बारसूची जागा दिल्याचे पत्र तत्कालीन मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्राला पाठवल्याचे समोर आले. शिवसेना शिंदे गट, भाजप यांनी ठाकरेंची यावरून कोंडी करायचा प्रयत्न केला. बारसू रिफायनरीबाबत केंद्राकडून वारंवार विचारणा होऊ लागल्यानंतर, प्राथमिक अहवाल मागवला. मात्र, प्रकल्प राबवला नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सांगत पत्राबाबत आज मौन सोडले. भारतीय कामगार सेनेच्या 55 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ठाकरे बोलत होते.
बारसूचा प्रकल्पाबाबद दपशाही : नाणार रिफायनरीला कडाडून विरोध झाल्यानंतर बारसूच्या जागेचा प्रस्ताव मी केंद्राकडे पाठवला होता. परंतु, अडीच वर्षात पोलिसांच्या बळावर तो प्रकल्प राबवला नाही. मात्र गद्दारी करून भाजपने सरकार पाडले. आरे कारशेड, कांजूरमार्ग, बुलेट ट्रेनचा प्रकल्प ज्या पद्धतीने फिरवला तसाच बारसूचा प्रकल्प देखील दडपशाहीने राबवला जात आहे. राज्याच्या मुळावर येणारे विषय मी अडवून ठेवले. त्यामुळेच सरकार पाडण्यात आल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
प्रकल्पाबाबत केंद्राला पत्र : आज बारसूवरुन रान पेटवले जात आहे. मी प्रकल्पाबाबत केंद्राला पत्र दिले होते. पण मी मुख्यमंत्री होतो तेंव्हा पत्र दिले होते. परंतु अडीच वर्षात पोलीसांमार्फत जबरदस्ती केली नव्हती? नाणार, बारसू बाबत जी भूमिका होती ती माझी नव्हती. स्थानिकांना रोजगार कायमस्वरूपी मिळायला हवा तो देणार का? असा सवाल त्यांनी विचारला. तसेच समृद्धी महामार्ग सारखा बारसूचा विषय का सोडवला जात नाही, कुणाची सुपारी तुम्हीं घेत आहात? तसेच मुख्यमंत्र्यांची आता पूजा झाली असेल तर त्यांनी जनतेचा समोर यावे असा सल्लाही ठाकरे यांनी दिला.
शिंदे सरकारवर घाणाघात : नाणार रिफायनरी प्रकल्पा विरोधातील काही वर्षांपूर्वी अनेक लोक भेटली. त्यांनी आंदोलनात साथ देण्याची मागणी केली. शिवसेना या आंदोलनात उतरली. पर्यावरणाला हानी करणारे प्रकल्प नको ही आमची भूमिका होती, आजही कायम आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर दिल्लीतून फोन यायला लागले. प्रकल्प चांगला आहे. सर्वात मोठा शुद्धीकरणाचा कारखाना असल्याने लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळतील, असा दावा करण्यात येऊ लागला. वारंवार विचारणा झाल्यानंतर मी बारसूचा प्राथमिक अहवाल मागून घेतला. बारसूत जागा देण्याबाबत लोकांनीच ठराव मंजूर केल्याचे सांगण्यात आले. सध्या खोके सरकार आले असून घरात घुसून पोलीस हा प्रकल्प राबवत असल्याचा घणाघात ठाकरेंनी चढवला. प्रकल्प चांगला असेल तर टाळक्यात मारून जोर जबरदस्तीने राबवण्याची गरज काय, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी विचारला.