मुंबई : गेल्या आठवड्यात लबाड लवादानं निकाल दिलाय, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर केला आहे. राहुल नार्वेकर, तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेत यावं. त्यानंतर कोण कोणाला गाडणार ते दाखवू, त्यानंतर खरी शिवसेना कुणाची कळेल, असं ठाकरे यांनी म्हटंलय. एकनाथ शिंदे टाईमपास करायला उच्च न्यायालयात गेले आहेत. निवडणूक आयोगानं मोठा घोटाळा केलाय. त्यांनी आमचे पैसे परत करावे, अशी मागणी ठाकरे यांनी केलीय. ईडी देखील त्यांचीच आहे, आत्ता उघड बोलतोय, असं म्हणत ठाकरेंनी निवडणूक आयोगाला फटकारलं आहे.
महाराष्ट्रातून लोकशाहीचा खून करण्यास सुरवात : तत्कालीन राज्यपाल भगतशिंह कोश्यारी सरकार पाडण्याच्या कटात सहभागी होते. त्यामुळं राज्यातलं सरकार कोसळलं. त्यानंतर राज्यात असंवैधानिक मिंधे सरकार आलं. विरोधक शिवसेना संपवण्याचा प्रयत्न करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस देखील संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. भाजपाचे अध्यक्ष उघड बोलताय. देशात एकच पक्ष राहणार, त्यामुळं लोकशाही टिकणार की नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे. महाराष्ट्रातून लोकशाहीचा खून करण्यास सुरवात झाल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटंलय. देशात घातक पद्धतीनं राजकारण सुरू आहे. मात्र महाराष्ट्राची माती गद्दारांना थारा देणार नाही, राज्याची माती त्यांना गाडून टाकेल. माझी निवड अमान्य असेल, तर माझी स्वाक्षरी कशी घेतली. शिवसेना हा माझ्या वडिलांचा पक्ष आहे, असं देखील ते म्हणाले.
निवडणूक आयोगावर गुन्हा दाखल करावा : निवडणूक आयोगाविरोधात गुन्हा दाखल करावा. त्यांनी आम्हाला कामाला लावलं होतं. आम्ही दिलेल्या लाखो रुपयांच्या कागदपत्रांचं त्यांनी काय केलं? त्यामुळं आमचे पैसे आम्हाला वापस द्यावे, अशी मागणी ठाकरे यांनी केलीय.
लढा उद्धव ठाकरेंचा नाही : हा फक्त उद्धव ठाकरेंचा लढा नाही. संपूर्ण जग पाहत आहे. या देशात लोकशाही आहे की नाही? ही एक लढाई आहे, सर्वोच्च न्यायालय किंवा लवाद कोण मोठा? लोकशाही टिकेल की नाही? सर्वोच्च न्यायालयाचं अस्तित्व, वर्चस्व टिकेल का? असे अनेक प्रश्न ठाकरे यांनी उपस्थित केले आहेत.
अपात्रतेचा निर्णय जनता घेणार : तुम्ही राजीनामा देऊ नये, असं अनेकांनी सांगितलं. मात्र, या पदावर 'मी' बसू नये, असं मला वाटलं, मी सत्तेच्या मागं नाही. म्हणून मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. आता ही लढाई शिवसेनेची नसून जेनतेची आहे. आम्ही पात्र आहोत की, नाही हे लोक ठरवतील, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.
मिंधेंनी जनतेसमोर सांगावं शिवसेना कुणाची? : सर्वोच्च न्यायालयाकडून आता शेवटची आशा आहे. लोकशाहीचा मूळ घटक असलेल्या जनतेच्या दरबारात आपण आलो आहोत. सरकार कोणाचंही असो, सत्ता सर्वसामान्यांचीच असली पाहिजे. माझं, नार्वेकर, मिंधेना जाहीरपणे आव्हान आहे. त्यांनी माझ्यासोबत जनतेत यावं, तिथं सांगावं खरी शिवसेना कुणाची? त्यानंतर जनतेने ठरवावं कोणाला पायदळी तुडवायचं, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
हेही वाचा -