मुंबई - आतापर्यंत राज्याचे नेतृत्त्व करणारे नेते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले होते. मात्र, मुंबई ही आर्थिक राजधानी असताना देखील मुंबईने आतापर्यंत महाराष्ट्राला एकही मुख्यमंत्री दिला नव्हता. मुंबई शहरातील मतदारसंघाने आतापर्यंत २ मुख्यमंत्री दिले. मात्र, मुळचे मुंबई शहरातील असलेले शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पहिलेच नेते ठरले आहेत.
मनोहर जोशी हे मुंबईतील दादर मतदारसंघातून निवडून आले होते. मात्र, त्यांचा जन्म कोकणातील आहे, तर बाबासाहेब भोसले हे देखील नेहरूनगर मतदारसंघातून निवडून आले होते. मात्र, ते मुळचे साताऱ्याचे आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणारे पहिलेच नेते ठरणार आहेत.
आतापर्यंत 18 मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचे नेतृत्त्व केले. त्यामध्ये विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण अशा अनेक भागातून आलेल्या नेत्यांचा समावेश होता. आता उद्धव ठाकरेंच्या रूपाने मुंबईतील दुसरा नेता मुख्यमंत्रिपदी विराजमान होत आहे. ते आज सायंकाळी 19 वे मुख्यमंत्री म्हणून शिवतिर्थावर मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील.
हे वाचलं का? - 'महा'शपथविधी LIVE : सत्तास्थापनेसाठी भाजपने महाराष्ट्रात निर्लज्ज प्रयत्न केले - सोनिया गांधी
मुख्यमंत्री पदासाठी भाजप शिवसेनेमध्ये चांगलाच वाद निर्माण झाला. मात्र, उद्धव ठाकरे शेवटपर्यंत आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यांच्या तटस्थ भूमिकेमुळेच आज शिवसेनेला मुख्यमंत्री पद मिळाले आहे. त्याठिकाणी शिवसैनिक बसवणार, असे उद्धव ठाकरे नेहमी सांगत होते. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार ३ पक्षांचे असल्यामुळे उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावे, ही इच्छा शरद पवारांनी बोलून दाखवली. त्यामुळेच मुंबईतील पहिला नेता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होत आहे.
आतापर्यंत झालेले मुख्यमंत्री आणि शहर
- मुख्यमंत्री शहर
- यशवंतराव चव्हाण कराड - सातारा
- मारोतराव कन्नमवार - चंद्रपूर
- पी. के. सावंत वेंगुर्ले - सिंधुदुर्ग
- वसंतराव नाईक पुसद - यवतमाळ
- शंकरराव चव्हाण भोकर - नांदेड
- वसंतदादा पाटील - सांगली
- शरद पवार - पुणे
- अब्दुल रहमान अंतुले - रायगड
- बाबासाहेब भोसले - नेहरूनगर
- शिवाजी पाटील निलंगेकर निलंगा - लातूर
- सुधाकरराव नाईक पुसद - यवतमाळ
- मनोहर जोशी - मुंबई
- नारायण राणे मालवण - सिंधुदूर्ग
- विलासराव देशमुख - लातूर
- सुशीलकुमार शिंदे - सोलापूर
- अशोक चव्हाण - नांदेड
- पृथ्वीराज चव्हाण - सातारा
- देवेंद्र फडणवीस - नागपूर