मुंबई - माझ्या मुलांसोबत इतरांच्या मुलांचेही मी हट्ट पुरवतो, म्हणूनच शिवसेना हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना लगावला. नुकतेच भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेले सुजय विखे-पाटील मातोश्रीवर ठाकरेंची भेट घेण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.
इतरांच्या पोरांचा मी विचार करतो. दुसऱ्यांच्या पोरांचा धुणीभांडी करण्यासाठी आम्ही वापर करत नाही, अशा शब्दात ठाकरेंनी पवारांवर टीका केली. दोन्ही पक्षाकडून दगाफटका होणार नाही, अशी हमीही यावेळी ठाकरेंनी सुजयला दिली. ठाकरे म्हणाले, की मंगळवारी रात्री मुख्यमंत्र्यांच्या भेटीत निवडणुकीची रणनीती ठरली असून काही जागांबाबत निर्णय घेण्यात आला आहे. येत्या २४ मार्चला शिवसेना-भाजपच्या युतीची कोल्हापूरला सभा होणार आहे. तसेच जालना मतदारसंघाच्या जागेबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नाही. अर्जुन खोतकर माझ्याकडे आल्यावर समोरासमोर त्यांच्याशी बोलणे होईल. युतीत आता मिठाचा खडा कोणी टाकू शकणार नाही, असे ते यावेळी म्हणाले.
नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मंगळवारी केले होते, त्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, शरद पवार हे अष्टपैलू नेते आहेत. नेता म्हणून ते चांगले आहेत, पण ते भविष्य कधीपासून सांगायला लागले, असा टोला त्यांनी पवारांना लगावला. आदित्य ठाकरे निवडणूक लढवणार का? असा प्रश्न त्यांना विचारल्यानंतर त्यांनी या प्रश्नावर उत्तर देताना सांगितले, की त्यांने निवडणूक लढवायची की नाही याचा निर्णय त्याने स्वतः घ्यावा. बाळासाहेबांनी माझ्यावर कोणते बंधन घातले नव्हते, तसे मी सुध्दा आदित्यवर कोणते बंधन घातले नाही. त्याने निवडणूक लढवायची की नाही हा निर्णय शिवसैनिक आणि तो स्वतः घेईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.