मुंबई Uddhav Thackeray : आम्ही राम मंदिरासाठी योगदान दिलंय. त्यामुळंच 'मी' मुख्यमंत्री असताना राम मंदिरात गेलो होतो. तसंच 'मी' केव्हाही अयोध्येला जाऊ शकतो. मात्र, सत्ताधाऱ्यांनी राम मंदिराचं राजकारण करू नये, असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपाला लगावला आहे. ते शनिवारी मुंबईत मातोश्रीवर पत्रकार परिषदेत बोलत होते.
फडणवीसांवर टीका : बाबरीचा ढाचा पडला, तेव्हा भाजपाचे नेते होते. शिवसेनेचं कोणी नव्हतं, असं विधान फडणवीस यांनी केलं होतं. त्यावरही उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलंय. कदाचित फडणवीस बाबरीच्या ढाच्यावर चढले असतील, त्यामुळं बाबरीचा ढाचा पडला असेल, अशी उपहासात्मक टीका उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर केलीय.
निमंत्रणावरुन वाद : सध्या देशातील तमाम हिंदुंचं अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण सोहळ्याकडं लक्ष लागलं आहे. या लोकार्पणासाठी देशभरातून मोठ्या प्रमाणात रामभक्त पायी चालत अयोध्येकडं जात आहेत. एकीकडं राम मंदिर लोकार्पण सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील दिग्गजांना निमंत्रण देण्यात येत आहे. 'या' निमंत्रणावरुन वाद सुरु असताना, दुसरीकडं बाबरीवरुन देखील वाद सुरू आहे.
कदाचित फडणवीसांच्या वजनामुळं पडली : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बाबरीबद्दल बोलताना म्हणाले की, बाबरी पाडण्यात शिवसेना कुठंच नव्हती. त्यावेळी शिवसेनेचे लोक घरात लपले होते. तेव्हा आम्ही कारसेवक होतो. तेव्हा दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना विचारण्यात आलं की, बाबरी पाडण्यात तुमच्या शिवसैनिकांचा हात होता का? तेव्हा बाळासाहेब ठाकरे म्हणाले, बाबरी पाडण्यात माझ्या शिवसैनिकांचा हात असेल, तर मला अभिमान आहे. त्यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्या वजनामुळं बाबरी पडली असावी.
पॉलिटिकल अजेंडा नको : पुढं बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, राम मंदिरासाठी सर्वांनी मोठा लढा उभारला आहे. खुद्द शिवसेनाप्रमुखांचाही त्यावेळी राम मंदिर तसंच हिंदुत्वाच्या प्रचारामुळं मतदानाचा हक्क हिरावून घेण्यात आला होता. अनेक कारसेवकांचं त्यावेळी रक्त सांडलं आहे. अनेक कारसेवकांना तुरुंगवास भोगावा लागला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर तिथं राम मंदिर बांधलं जात आहे. आम्ही तेव्हा भाजपासोबत असल्यानं आम्हाला राम मंदिर हवं होतं. आज राम मंदिर झालं, याचा मला आनंद आहे. यासाठी अनेकांचं योगदान आहे. मात्र, भाजपानं राम मंदिर 'हा' राजकीय अजेंडा बनवू नये.
जागावाटप सुरळीत पार पडेल : लोकसभेच्या जागा वाटपावरुन महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही. जागा वाटप सुरळीत पार पडेल. 'वंचित'बाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असं उद्धव ठाकरे यांनी म्हणटलंय.
हेही वाचा -
- फडणवीस यांच्या अयोध्या वक्तव्यावरील प्रश्नाला मुख्यमंत्र्यांनी दिली बगल, फोटोसेशनवरुन विरोधकांच्या टीकेलाही चोख प्रत्युत्तर
- माजी मंत्री सुनील केदारांचा कारागृहातील मुक्काम वाढला, जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला
- आधुनिक भारताच्या ट्रेनची जालन्यातून सुरूवात, राम लोकांच्या मनातनं तुम्ही काढूच शकत नाही - देवेंद्र फडणवीस