मुंबई - २९ जानेवारीपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्वपक्षीय खासदारांची बैठक बोलावली आहे. सह्याद्री अतिथीगृहावर आज ही बैठक होईल. राज्यातील विविध मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होणार आहे.
या मुद्द्यांवर होणार चर्चा -
कोरोना काळात राज्याला केंद्र सरकारकडून कमी प्रमाणात निधी मिळाला आहे. केंद्र सरकारकडून राज्याला ३६ हजार कोटींहून अधिक निधी येणे बाकी आहे. केंद्राकडे शिल्लक असलेला हा निधी राज्याला मिळावा यासाठी सर्वपक्षीय खासदारांनी प्रयत्न करावेत, अशी सूचना मुख्यमंत्री या बैठकीत करणार आहेत. मुंबईमधील मेट्रो कारशेडचा वाद सुरू आहे. हा वाद मिटवण्यासाठी खासदारांनी प्रयत्न करावेत. मेट्रो कारशेडचे काम लवकरात लवकर मार्गी लागावे यासाठी केंद्र सरकारकडून कांजूरच्या जागेवर केलेला दावा मागे घेण्याबाबत सूचना करावी, असे खासदारांना सांगण्यात येऊ शकते. मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टात केंद्राने योग्य बाजू मांडण्याची विनंती खासदारांनी करावी, असेही मुख्यमंत्री खासदारांना सांगतील अशी माहिती मिळत आहे.
29 जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन -
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची घोषणा झाली आहे. 29 जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार असून 8 एप्रिलपर्यंत चालणार आहे. एक फेब्रुवारीला संसदेत 2021-22 चा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. सकाळ आणि दुपार या दोन सत्रांमध्ये संसदेच्या दोन सभागृहांचे कामकाज चालेल.