मुंबई : उद्धव ठाकरे यांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निष्क्रियतेचा ठपका ठेवला. राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या सत्ता काळातील कार्यपद्धतीवर सडकून टीका केली. डॉक्टर उद्धव ठाकरे यांनी ठाण्यातील महिला गरोदर असल्याचा अजब शोध लावल्याचेही राणे म्हणाले आहेत. उद्धव ठाकरेंच्या मनात असूया आणि मत्सर आजही आहे. मुख्यमंत्री पदाच्या त्यांच्या काळात कायदा व सुव्यवस्थाचा बट्ट्याबोळ उडाला होता. सुशांत सिंग, दिशा सालीयनला का मारले.? सचिन वाजे कोण आहेत? जावई आहेत का? गुन्हेगारांना मदत करणारा मुख्यमंत्री होतो. देशाबाहेरील व्यक्तीसोबत संबंध असणाऱ्या नवाब मलिक यांना मंत्रिमंडळात ठेवण्यात आले. ज्यांची लायकी नाही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री एक देवेंद्र फडणवीसांवर बोलाव, हे योग्य नाही. ठाकरे राज्याच्या विकासावर, शेतकरी, विद्यार्थी यांच्याबाबत अनभिज्ञ असल्याची टीका राणेंनी केली आहे.
कोरोना काळात खोके घेतले : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुला व्यतिरिक्त काहीच नाहीत. बाळासाहेबांच्या नखाची उद्धव ठाकरे यांना सर नाही. ते शेंबडे असून, शिवसेनेत त्यांचे योगदान काय असा सवाल राणेंनी विचारला. मुख्यमंत्री पदाच्या काळात खोके घेतले. मात्र, त्यातून कोणालाही दानधर्म केलेले नाही. उलट कोरोना काळात 15 टक्के कमिशन आदित्य ठाकरे यांनी घेतल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला. उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना फसवलं. अतिशय खोटाडा आणि लबाड माणूस आहे हा असही ते यावेळी म्हणाले आहेत. एका बाईसाठी कुटूंबासमवेत ठाण्यात गेले. एकट्याला जाण्याची हिंमत नाही त्यामुळे सपत्नीक गेल्याचेही राणे म्हणाले आहेत.
यात्रा, सभा बंद कराव्यात : उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना फडतूस म्हटले. रस्त्यावर उतरण्याचे खुले आव्हान दिले आहे. ठाकरेंनी कोणताही मैदानात यावं आम्ही तयार आहोत. बाळासाहेबांच्या कृपेने तुम्ही सुरक्षित आहात. मात्र, पंतप्रधान आणि फडणवीस यांच्यावर टीका केली तर त्याची भरपाई करू, ठाकरेंचा तळ उध्वस्त करू, असा इशारा राणे यांनी देताना, गृहमंत्री फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाबत विधाने केल्यास भाजप गप्प राहणार नाही. राज्यात सुरू असलेल्या सभा आणि यात्रा त्यांनी बंद कराव्या. आता सत्ता आमच्या हातात आहे, अशी धमकी देखील यांनी यावेळी दिली आहे.
बाळासाहेबांच्या पुण्याईमुळे बाहेर : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि राज्याला अधोगतीकडे नेले. राज्याला हा माणूस कलंक आहे. महाविकास आघाडीने देखील उद्धव ठाकरे यांना शिव्या देणे आणि डोळा मारण्यासाठीच जवळ केले आहे. जगाच्या पाठीवर पंतप्रधानांनी नाव कमावले. जगात अर्थव्यवस्था नवव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणली. परंतु, उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यावर टीका करतात. बाळासाहेबांच्या पुण्याईमुळे उद्धव ठाकरे बाहेर आहेत. मात्र, सुशांत सिंग प्रकरणात अमित शहा यांनी पाठ फिरवल्यास त्यांना योग्य जागी पाठवले जाईल, असा इशारा राणे यांनी दिला.
हेही वाचा : Anil Ambani : 28 एप्रिलपर्यंत अनिल अंबानींवर कोणतीही कारवाई न करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश