मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची असल्याचा निकाल केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकताच दिला. पक्ष आणि चिन्ह दोन्ही शिंदे यांना दिल्यामुळे आयोगाच्या निर्णयावर शंका उपस्थित केली जात आहे. आयोगाच्या निर्णया विरोधात ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. मात्र, या निर्णयामुळे शिवसेनेतील स्थानिक पातळीवरची घडी विस्कळीत होऊ नये, यासाठी उद्धव ठाकरे यांनी कंबर कसली आहे. येत्या काही महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाला धनुष्यबाणाशिवाय या निवडणुका लढाव्या लागणार आहेत. त्यामुळे चिन्हासाठी अनेकजण शिंदे गटात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर कुणीही पक्ष सोडून कुठे जाऊ नये, म्हणून काय करता येईल यावर ठोस भूमिका ठरवली जाणार आहे. त्यादृष्टीने आजच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली आहे.
आज जिल्हाप्रमुखांची बैठक : दोन दिवसांपूर्वी आमदार खासदारांची बैठक घेतल्यानंतर आज जिल्हाप्रमुखांची बैठक बोलावली आहे. दुपारी बारा वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल देसाई, अनिल परब आदी वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हेच पक्षाचे नाव घेऊन जायचे की, शिवसेना या नावाच्या मागे पुढे काही शब्द जोडायचा यावरही खलबत होणार आहेत. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर मोठ्या प्रमाणात शिवसेनेकांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला होता. भाजप आणि शिंदे गटाला कशा प्रकारे शह देता येईल, याचे नियोजन देखील आजच्या बैठकीत होणार आहे.
शिंदे सेनेची देखील बैठक : येत्या २७ फेब्रुवारी पासून राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. अधिवेशन काळात पक्षाची भूमिका ठरवण्यासाठी शिंदे गटाचे प्रतोद भरत शेठ गोगावले यांनी सर्व आमदारांना व्हीप बजावला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाची मान्यता शिंदे गटाच्या बाजूने दिली. पक्षाला मान्यता मिळताच गोगावले यांनी, धनुष्यबाण चिन्हावर निवडून आलेल्या सर्व आमदाराना व्हीप बाजवला. आज सकाळी ११ वाजता ही बैठक होणार आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अद्याप आलेला नाही. त्यामुळे शिंदे गटाचा व्हीप लागू होतो का, ही कायदेशीर बाब आहे. मात्र, या बैठकीला ठाकरे गटाचे आमदार उपस्थित राहतात का, हे पाहणे महत्त्वाचे आहे.