मुंबई - मुख्यमंत्री सहायता कक्ष चालू झाला नाही तर, तो शिवसेना पद्धतीने चालू करू, असा इशारा म्हाडाचे अध्यक्ष आमदार उदय सामंत यांनी दिला. मुख्यमंत्री सहायता कक्ष राष्ट्रपती राजवटीत बंद करण्यात आला आहे. तो लवकरात लवकर चालू करावा, अशी मागणी सामंत यांनी केली आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त भांडुप येथील मैत्री निवासस्थानी आमदार उदय सामंत यांनी संजय राऊत यांची भेट घेतली. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेची भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. ते एक शिवसेनेचे मोठे नेते आहेत. पक्षाच्या ध्येय धोरणाच्या भूमिकेतील त्यांचे मत महत्त्वाचे असल्याचे सामंत म्हणाले. मी मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्री सहायता कक्ष कसा चालू करता येईल यासाठी अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री सहायता कक्ष राज्यातील गोरगरीब जनतेला एक हातभार लावण्यासाठी आहे. यात अधिकाऱ्यांनी कोणताही दुजाभाव न करता विभाग चालू करावा. हा कक्ष चालू केला नाही तर शिवसेना आपल्या परीने कक्ष चालू करेल, असे उदय सामंत म्हणाले.