मुंबई - बॉलिवूडमध्ये सुरू असलेल्या ड्रग्स सिंडिकेट प्रकरणी एनसीबीकडून तपास केला जात आहे. या संदर्भात एनसीबी जोन-2 च्या दोन अधिकाऱ्यांना तपासामध्ये हलगर्जीपणा दाखवल्याबद्दल निलंबित करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. हे दोन अधिकारी तपासाशी थेट निगडीत नसले तरी अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या जामीनाच्याबाबतीत त्यांनी हलगर्जीपणा केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानंतर या दोन अधिकाऱ्यांची प्राथमिक चौकशी करण्यात आली होती. चौकशीत त्यांनी समाधानकारक उत्तरे न दिल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
कॉमेडियन भारती सिंग व हर्ष लिंबाचियाच्या जामीनाला एनसीबीकडून विरोध -
अमली पदार्थ बाळगणे व त्याचे सेवन करणे या गुन्ह्यासंदर्भात अटक करण्यात आलेल्या कॉमेडियन भारती सिंग व तिचा पती हर्ष लिंबाचीया यांना जामीन मिळाला आहे. या विरोधात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो(एनसीबी)कडून न्यायालयामध्ये दाद मागितली जाणार आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये कॉमेडियन भारती सिंहच्या मुंबईतील अंधेरी स्थित घरावर एनसीबीकडून छापा टाकण्यात आला होता.
भारतीच्या घरी मिळाला होता 86 ग्रॅम गांजा -
भारती सिंगच्या ताब्यातून 86 ग्रॅम गांजा हस्तगत करण्यात आला होता. त्यानंतर भारती सिंग व तिचा पती हर्ष लिंबाचीया या दोघांना अटक झाली होती. या दरम्यान करण्यात आलेल्या चौकशीत भारती सिंग व हर्ष लिंबाचीया या दोघांनी अमली पदार्थाचे सेवन करत असल्याचे मान्य केले होते. न्यायालयाने या दोघांची 15 हजारांच्या जामीनावर मुक्तता केली आहे.
यानंतर एनसीबीने केलेल्या पुढील कारवाईदरम्यान अंधेरी-वर्सोवा परिसरातून काही ड्रग्स पेडलर्सला अटक करण्यात आलेली होती. या ड्रग्स तस्करांपैकी काही जणांनी भारती सिंग व तिचा पती हर्ष लिंबाचीया या दोघांना अमली पदार्थाचा पुरवठा करत असल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे आता एनडीपीएस न्यायालयामध्ये भारती सिंग व तिचा पती हर्ष लिंबाचीया या दोघांचा जामीन रद्द करावा म्हणून मागणी करण्यात येत आहे.