मुंबई - राज्यात लॉकडाऊनच्या काळात जळगाव आणि हिंगोली येथील दोन धाडसी मातांनी आपल्या मुलांना दुसरा जन्म दिला आहे. यकृताच्या कर्करोगाने ग्रासलेल्या मुलांना आपले यकृत देऊन त्यांनी मुलांचा जीव वाचवला आहे. दोन्ही मुलांची यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून आता मुले आणि माता ठणठणीत होऊन घरी परतले आहेत.
जळगावमधील आराध्य सरोदे (६) आणि हिंगोलीतील मयुरी ढेंबरे या दोघांनाही जन्मतःच ‘हेपाटोब्लास्टोमा’ (बालपणातील एक अत्यंत दुर्मिळ यकृत कर्करोग) हा कर्करोग झाला होता. या आजारामुळे त्यांचे यकृत हळूहळू निकामी होत गेले. अशावेळी लवकरात लवकर यकृत प्रत्यारोपण करणे गरजेचे झाले. दोन्ही कुटुंब गरीब असल्याने यकृत मिळणार कुठे हा प्रश्न पडला. दरम्यान, या दोन्ही मुलांना परळ येथील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. लॉकडाऊन सुरू झाल्याने जवळ पैसा नव्हता. त्यामुळे शेवटी या दोन्ही मुलांच्या आईने यकृताचा भाग देण्याचा निर्णय घेतला.
दोन्ही मुलांच्या मातांच्या या निर्णयानंतर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. ही शस्त्रक्रिया अत्यंत अवघड, गुंतागुंतीची, जोखमीची होती. पण ग्लोबल हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्टा करत अखेर ही शस्त्रक्रिया यशस्वी केली. प्रत्यारोपण सर्जन डॉ. रवी मोहंका आणि डॉ. अनुराग श्रीमल यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरांच्या चमूने ही शस्त्रक्रिया केली. या मुलांचा जीव वाचवण्यासाठी त्वरित प्रत्यारोपण करणे गरजेचे होते. त्यानुसार वेळेत त्यांच्या आईने यकृताचा ३० ते ४० टक्के भाग दिला आणि जीव वाचवल्याचे डॉ. रवी मोहंका यांनी सांगितले. शस्त्रक्रिया करण्यापूर्वी या दोन्ही मुलांची कोविड-१९ चाचणी करण्यात आली. हा चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरच शस्त्रक्रिया करण्यात आली, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, मयुरीची आई (आशा ढेंबरे) यांचा रक्तगट जुळत नसल्याने त्यांना एक विशिष्ट इंजेक्शन देण्यात आले होते. त्यानंतर १ मे रोजी तिच्यावर यकृत प्रत्यारोपण पार पडले. याशिवाय २० मे रोजी आराध्याच्या आईने यकृत दान केल्यावर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर या चौघांची योग्य काळजी घेत त्यांची तब्येत ठणठणीत झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे.