मुंबई - मिशन बिगिन अगेनच्या दुसऱ्या टप्प्यात केशकर्तनालय, हॉटेल, लॉज आणि दुकानांना परवानगी दिली होती. त्यानंतर दुकानांमधील गर्दी होणारी गर्दी नियंत्रीत करण्यासाठी राज्यातील दुकाने तसेच मार्केट खुली ठेवण्यासाठी दोन तास वाढवून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
राज्यातील प्रतिबंधित क्षेत्र (कंटेनमेंट झोन) सोडून इतर क्षेत्रातील दुकाने ही सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत खुली ठेवता येणार आहेत. गुरुवारपासून (9 जुलै) ही संमती देण्यात मिळणार असून आधीच्या आदेशात लागू करण्यात आलेले नियम कायम असणार आहेत. मिशन बिगिन अगेनच्या पाचव्या टप्प्यांतर्गत मंगळवारी (दि. 7 जुलै) यासंदर्भातील आदेश मुख्य सचिव संजीव कुमार यांनी जाहीर केले आहेत.
मुंबई महानगर क्षेत्रातील महापालिका, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि नागपूर या क्षेत्रात मिशन बिगिन अगेन टप्पा 2 मध्ये मार्केट तसेच अत्यावश्यक नसलेल्या दुकानांना पी वन – पी टू बेसीसवर सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत खुली ठेवण्यास संमती देण्यात आली होती. आता दुकानांवर होणारी गर्दी नियंत्रीत तथा कमी करण्याच्या अनुषंगाने यासाठी दोन तास वाढवून देण्यात आले आहेत. या महापालिकांमधील प्रतिबंधित क्षेत्र (कंटेनमेंट झोन) वगळता इतर क्षेत्रातील बाजार, दुकानांना आठवड्यातील सात दिवस सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत परवानगी देण्यात येत आहे.
सामाजिक अंतराचे पालन न केल्याचे आढळल्यास किंवा गर्दी होत असल्याचे लक्षात आल्यास प्रशासनाकडून संबंधीत दुकाने किंवा मार्केट बंद करण्यात येतील. मार्केटमधील गर्दी कमी करण्यासाठी या वाढीव वेळेचा संबंधीत मार्केट आणि दुकान मालक वापर करतील, असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा - पर्यटन कंपन्यांची मनमानी; रद्द झालेल्या परदेशवारीचे पैसे न देण्यासाठी नवी शक्कल