मुंबई : माझगाव येथील बीपीटी कॉलनी परिसरातून अमली पदार्थ विरोधी कक्षाच्या आझाद मैदान युनिटने ड्रग्स तस्करी करणाऱ्या दोन इसमांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दहा लाख 60 हजार किमतीचा एमडी ड्रग्स तसेच 24 हजार किमतीचा गांजा जप्त केला आहे. या दोन्ही आरोपींविरोधात एनडीपीएस कायदा 1985 कलम 8 क, 20 ब, 22 क आणि 29 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक आरोपी कळवा येथे राहत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. तर, दुसरा आरोपी शिवडी येथे राहत होता असल्याची माहिती मिळते आहे.
गुन्ह्याची थोडक्यात हकीकत : 27 जानेवारी रोजी दुपारी 12.30 च्या सुमारास पोलीस निरीक्षक राजेंद्र दहिफळे, पोलीस उपनिरीक्षक आवळे आणि पोलीस पथकातील वरिष्ठ सदस्यांनी एकता नगर, माझगाव परिसरात वाँटेड फरारी आरोपी तसेच अमली पदार्थ विक्रेत्यांचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. बी.पी.टी. घटनास्थळी गस्त घालत असताना अर्धवट रिकामी झालेली इमारत पाहून दोघेजण पळून जात असताना पोलिसांनी त्यांना पकडले.
दोन्ही आरोपींना अटक : यावेळी पोलिसांनी इसमांच्या ताब्यातुन १ किलो २०० ग्रॅम गांजा तसेच 'एमडी' (मेफेड्रॉन) अंमली पदार्थ जप्त केले. आरोपींविरुद्ध अंमली पदार्थ विरोधी पथकाने कलम ८ (क) सह २०(ब), २२ (क), २९ एन्. डी. पी. एस्. अॅक्ट १९८५ अन्वये गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
आरोपीला पोलीस कोठडी : यातील २२ वर्षीय अटक आरोपीविरोधात बृहन्मुंबई अंर्तगत भायखळा पोलीस ठाणे, इतर पोलीस ठाण्यात घरफोडी, चोरी, जबरी चोरी असे एकूण ५ गुन्हे दाखल आहेत. या अटक दोन्ही आरोपींना ३० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे), लक्ष्मी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे),ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस उप आयुक्त, प्रकाश आधय, सहाय्यक पोलीस आयुक्त,सावळाराम आगवणे अंमली पदार्थ विरोधी कक्ष, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रभारी पोलीस निरीक्षक राजेंद्र दहिफळे यांचे नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद आवळे पोलीस हवालदार दोगे, पाटील, करांडे पोलीस शिपाई भोसले, सिंह, राठोड, कर यांनी पार पाडली असून गुन्हयाचा पुढील तपास वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद आले हे करीत आहेत.