मुंबई - मुंबई शहरातून भाड्याने गाडी घेऊन हैदराबाद, कर्नाटक, तेलंगणासारख्या परिसरात मोबाईलची दुकाने फोडून लाखो रुपयांचा माल उडवणाऱ्या 2 आरोपींना मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे.
![मुंबई मोहम्मद तरबेज फरहान मुमताज शेख अटक](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-02-12-haidrabad-7201159_12122020111624_1212f_1607751984_303.jpg)
काही दिवसांपूर्वी हैदराबादमधील एका मोबाईल शॉपवर दरोडा टाकून या आरोपींनी तब्बल 119 मोबाईल पळवले होते. हैदराबाद पोलीस या संदर्भात तपास करत असताना आरोपींनी वापरलेल्या गाडीचा शोध घेतला जात असता, ती गाडी मुंबईतील असल्याचे त्यांच्या लक्षात आले होते. त्यानंतर हैदराबाद पोलिसांनी मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाला संपर्क साधून सहकार्य करण्याची विनंती केली होती. त्याप्रमाणे मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने तपास केला असता, ही गाडी सर्जेराव देशमुख यांच्या नावावर असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
हेही वाचा - सोलापूरात बेकायदा प्लास्टिक विक्री करणाऱ्या दुकानांवर कारवाई; १८० किलो प्लास्टिक जप्त
सुरतला जात असल्याचे सांगून चालक हैदराबादला जात असे
खंडणीविरोधी पथकाने गाडीचा मालक सर्जेराव देशमुख याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता, त्याने त्याच्याकडील इनोव्हा गाडी बऱ्याच वेळा त्याचा ड्रायव्हर मोहम्मद तरबेज याला बऱ्याच वेळा वैयक्तिक वापरासाठी भाड्यावर दिली असल्याचे सांगितले होते. त्यानंतर मुंबई पोलिसांनी मोहम्मद तरबेज याला अटक करून त्याची चौकशी केली असता त्याने त्याच्या साथीदारांसोबत मिळून कर्नाटक, हैदराबाद, तेलंगणासह पुण्यात सुद्धा घरफोडी व दरोड्याचे गुन्हे केल्याचे कबूल केले आहे. या टोळीचा म्होरक्या फरहान मुमताज शेख यालाही पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून त्यांनी वापरलेली इनोव्हा कार, चोरलेले मोबाईल फोन यासह इतर मुद्देमालही हस्तगत केला आहे. अटक करण्यात आलेल्या 2 आरोपींवर 25 हून अधिक गुन्हे मुंबईतील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये व राज्याबाहेरील पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. सध्या या आरोपींना मुंबई पोलिसांनी हैदराबाद पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
हेही वाचा - वणीत ७३ लाखांच्या दारूवर फिरवला रोडरोलर; न्यायालयाच्या आदेशाने कारवाई