मुंबई - केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आज 1 मार्चपासून शासकीय तसेच खासगी आरोग्य संस्थांमध्ये वय वर्षे 45 ते 59 ज्यांना सहव्याधी आहे (कोमॉरबीड) आणि 60 वर्षांवरील व्यक्तिंना लसीकरण केले जाणार आहे. त्यासाठी राज्यात 550 शासकीय आणि 100 खासगी रुग्णालयात लसीकरण सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे.
लसीकरण
सध्या राज्यात केंद्राच्या सूचनेप्रमाणे ज्या खासगी आरोग्य संस्था या आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तसेच केंद्र शासनाच्या आरोग्य योजना आणि राज्य शासनाच्या महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना या योजनांमध्ये सहभागी आहेत अशा ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्यामध्ये आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाइन वर्कर सोबतच आता 45 वर्षांपेक्षा अधिक ज्यांना सहव्याधी आहेत आणि 60 वर्षांपर्यंत व्यक्तींना लसीकरण करण्यात येणार आहे. या वयोगटातील व्यक्तींसाठी प्री सेल्फ रजिस्ट्रेशन व अपॉइंटमेंट घेणे तसेच ऑनसाईट अपॉइंटमेंट आणि लसीकरण करुन घेणे, कोविन ॲपद्वारे लसीकरणासाठी वेळ निश्चित केली जाणार आहे.
250 रुपये प्रति डोस शुल्क
शासकीय आरोग्य संस्थांमध्ये लसीकरण मोफत असेल तर खासगी आरोग्य संस्थांमध्ये त्यासाठी शुल्क द्यावे लागणार आहे. सद्यस्थितीत खासगी आरोग्य संस्था यूजर फी म्हणून 100 रुपये व लसीची किंमत म्हणून 150 रुपये, असे एकूण 250 रुपये प्रति डोस प्रति व्यक्ती असे शुल्क आकारणार आहे. राज्यात सद्यस्थितीमध्ये पुरेशा प्रमाणात लसींचा साठा उपलब्ध आहे. 1 मार्चपासून वापरात येणाऱ्या कोविन ॲप विषयी केंद्र शासनाने शासकीय व खासगी आरोग्य संस्थांचे प्रशिक्षण आज घेतले. राज्य स्तरावरून सर्व जिल्हा व महापालिका लसीकरण अधिकारी यांचे लसीकरणाचे तसेच कोविन ॲपच्या वापराविषयी प्रशिक्षण घेण्यात आले आहे.
हे पुरावे आवश्यक
लसीकरणासाठी 45 वर्षांपेक्षा अधिक आणि सहव्याधी असलेले ते 60 वर्षे वयोगटातील व्यक्तींसाठी खालील कागदपत्रे आणणे आवश्यक आहे. आधार कार्ड, छायाचित्र असलेले मतदान कार्ड, ऑनलाइन नोंदणीच्या वेळी जर आधार कार्ड किंवा मतदान कार्ड या व्यतिरिक्त अन्य फोटो आयडी वापरले असेल तर ते सोबत घेऊन जाणे गरजेचे आहे. 45 ते 60 वर्षे या वयोगटातील ज्या व्यक्तींना सहव्याधी (को-मोरबीडीटी) असेल त्यांनी नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाकडून सहव्याधी असल्याचे प्रमाणपत्र सोबत बाळगणे आवश्यक आहे. लसीकरण केंद्रावर येताना आरोग्य कर्मचारी आणि फ्रन्टलाइन वर्कर यांनी एम्प्लॉयमेंट सर्टीफिकेट किंवा कार्यालयीन ओळखपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे.
हेही वाचा - फेब्रुवारीत 26 दिवसांत 10 हजार 172 घरांची विक्री तर 352 कोटी महसूल