मुंबई - जागतिक महिला दिनानिमित्त तृतीयपंथी आणि वैश्य व्यावसायिक मुलांसाठी सामाजिक काम करणाऱ्या तृतीयपंथी कार्यकर्ता गौरी सावंत यांचा जीवनप्रवास उलगडणारे 'गौरी - द अर्ज टू फ्लाय' हे पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे. राईट क्लिक पब्लिकेशनद्वारे प्रकाशित होणाऱ्या या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे शुक्रवारी जागतिक महिला दिनानिमित्त मुंबईत अनावरण झाले.
वेश्या व्यवसायिक महिलेची मुलगी दत्तक घेऊन कर्तव्य करणाऱ्या प्रथम तृतीयपंथीय ठरलेल्या गौरी सावंत यांचा जीवनप्रवास संघर्ष शोध पुस्तकात मांडला आहे. त्यांच्या 'नानी का घर' या स्वयंसेवी संस्थेतील नानी या व्यक्तिरेखेचे पैलू समाजापर्यंत आणण्याचा प्रयत्न यामध्ये करण्यात आला आहे. २००१ मध्ये गायत्रीला दत्तक घेतल्यानंतर 'नानी का घर' या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून वेश्यांच्या मुलांना तसेच तृतीयपंथी असणाऱ्या मुलांना दत्तक घेऊन त्यांचा सांभाळ करण्याचे, त्यांना शिक्षण देणे आणि आरोग्याची काळजी घेण्याचे काम गौरी सावंत करत आहेत. त्यासाठी त्यांना आलेल्या समस्या, आव्हाने व त्यांनी दिलेला लढा याची माहिती या पुस्तकाद्वारे उलगडणार आहे.
या पुस्तकाचे प्रकाशन येत्या १२ मे २०१९ ला मातृदिनी होणार असल्याची माहिती युवा लेखक रिदम वाघोलीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. 'अप्पलाऊड' या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक रिदम वाघोलीकर हे या पुस्तकाचे लेखक आहेत. रिदम यांनी अनोख्या ग्रामोफोन आकारात मुद्रित झालेले जगातील पहिले 'स्वरलता - रिदमिक रेमिनिसेस ऑफ लता दीदी' हे लता मंगेशकर यांच्यावरील पुस्तक लिहिले आहे. तसेच स्वरमंडळ (इंडियन हार्प) आकारातील किशोरी अमोणकर यांच्यावरील 'द सोल स्टीरिंग व्हॉईस—गानसरस्वती किशोरी आमोणकर' हे पुस्तक लिहिले आहे. प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या महात्मा गांधी सन्मानाने सन्मानित झालेले ते सर्वात तरुण भारतीय आहेत.
एचआयव्ही झालेल्या वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या ५ वर्षाच्या मुलीला दत्तक घेतले आणि मातृत्वाचा प्रवास सुरू झाला. गायत्रीमुळे मला आईपण मिळाले आणि 'नानी का घर' या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून ते पुढे कार्यरत आहे, असे तृतीयपंथी कार्यकर्ता गौरी सावंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी बोलताना वाघोलीकर यांनी सांगितले की, गौरी सावंत या एक योद्धा आहेत. त्यांचा आजपर्यंतचा प्रवास अत्यंत प्रशंसनीय आहे. सर्वोच्च न्यायालयात लढा देणाऱ्या गौरी सावंत तृतीयपंथीयांच्या आई आहेत. त्यांनी नारी शक्तीचा वापर करून गायत्रीला तस्करीपासून वाचवून दत्तक घेतले. गायत्रीला आपला निस्वार्थ आणि विधायक पंखाची उब दिली. तेव्हापासून त्या सेक्स वर्कर मुलांसाठी आणि जन्मतः तृतीयपंथी असणाऱ्यांसाठी सतत कार्यरत आहेत. अशाप्रकारे गौरी सावंत यांचा जीवनप्रवास समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी हे पुस्तक लिहिण्याची कल्पना सुचल्याचे वाघोलीकर यांनी सांगितले.
हे पुस्तक खूप लोकांपर्यंत पोहोचेल, अशी आम्हाला आशा आहे. तसेच या पुस्तकाद्वारे गौरी आणि तृतीयपंथी कुटुंबाला जी मदत होईल, त्यातून लोकांनाही समाधान लाभेल, असा विश्वासही वाघोलीकर यांनी यावेळी व्यक्त केला.