मुंबई - समाजातील दुर्बल, भटक्या जमातींच्या समस्याही मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत तृतीयपंथी, जोगवा मागणारे तृतीयपंथी, नागपंथी आदी दुर्बल घटकांमधील दुर्लक्षित समाजाला त्यांचे न्याय-हक्क मिळवून देण्यासाठी तृतीयपंथी समाजातील जतीन महाराज उर्फ मम्मी हे निवडणुकीच्या रणागणांत उतरले आहेत. ईशान्य मुंबई (उत्तर पूर्व) मतदारसंघातून ते लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. या निवडणुकीच्या माध्यमातून आमचे प्रश्न आणि समस्या नागरिकांपर्यंत घेऊन जाणार असल्याचे त्यांनी "ई टीव्ही भारत"शी बोलताना सांगितले.
जतीन म्हणाले, महाराष्ट्र देवदासी निराधार महिला संघटनेच्या माध्यमातून विलास रुपवते यांच्या नेतृत्वाखाली तृतीयपंथी, जोगवा मागणारे तृतीयपंथी, नागपंथी आदी समाजाचे अनेक प्रश्न सरकारसमोर ठेवले होते. पिण्याचे पाणी, आहार भत्ता, मेडिकल सुविधा, अर्धा प्रवास भत्ता द्यावा आदी मागण्या सरकारकडे करण्यात आल्या होत्या. त्यासाठी सरकराकडे पत्रव्यवहार केला, अर्धनग्न मोर्चा काढला. आमच्या संस्थेचे आठ लाख सदस्य असले तरी सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवदासी, विधवा, तृतीयपंथी, कामगार, रिक्षा चालक, नाका कामगार, अशा दुर्बल व दुर्लक्षित घटकातील लोकांना एकत्र करून दुर्बल घटक आघाडीची स्थापना करण्यात आली. या अंतर्गत राज्यात २१ मतदारसंघात व मुंबईत सहाही मतदारसंघात उमेदवार उभे करण्यात आले आहेत. त्यापैकी दोन तृतीयपंथी तर एक अंध उमेदवार असल्याचे मम्मी यांनी सांगितले.
सरकार आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने महागाई, पाणी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, पीक विमा, शहिद सैनिकांच्या वारसांना सरकारी नोकरी, मोफत शिक्षण, तृतीयपंथी व मागास समाजाचे प्रश्न, तृतीयपंथी समाजाला आरक्षण, विधानपरिषद, लोकसभेत ५० टक्के आरक्षण महिलांना त्याच धर्तीवर तृतीयपंथीयांना आरक्षण असावे आदी मुद्दे घेऊन आम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहोत. आमचा समाज हा भिक्षा, जोगवा मागून जगणारा समाज आहे. समाजातील आर्थिक परिस्थिती खराब आहे. याकारणाने आम्ही इतर उमेदवारांसारखा प्रचार करु शकत नसलो तरी देवदासी, नागपंथी, गोसावी आदी दुर्बल घटकातील लोक घरोघरी जाऊन आमचा प्रचार करतील असे मम्मी यांनी सांगितले. आमची जिद्द आहे त्याच जोरावर आम्ही आमची ताकद दाखवून निवडणूक लढवत असल्याचे मम्मी म्हणाल्या.
कोण आहेत जतीन महाराज -
जतीन महाराज उर्फ मम्मी यांचे प्राथमिक शिक्षण घाटकोपर येथील माणिकलाल मेहता शाळेतून झाले. माध्यमिक शिक्षण सर्वोदय हायस्कुल येथून झाले. त्यांनी एफवायजेसीपर्यंत शिक्षण घेतले आहे. शिक्षण घेताना
वयाच्या १२ व्या वर्षी त्यांना आपण तृतीयपंथी असल्याची जाणीव झाली. तेव्हापासून त्यांनी जोगवा मागायला सुरुवात केली असल्याचे जतीन यांनी यावेळी बोलताना सांगितले.