मुंबई : गेल्या सहा महिन्यात मुंबईत 1 लाख 58 हजार 396 मुंबईकरांनी वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली केली आहे. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मुंबईकरांनी वाहतुकीचे नियम कमी प्रमाणात तोडले असल्याचे स्पष्ट होत आहे. जानेवारी ते जुलै 2022 ला 27 लाख 94 हजार 301 मुंबईकरांनी वाहतुकीचे नियम मोडले होते. तरी यंदा जानेवारी ते जुलै 2023 दरम्यान एक लाख 58 हजार 396 मुंबईकरांनी वाहतुकीच्या नियमांचे पायमल्ली केलेली आहे. आकडेवारीवरून लक्षात येते की, यंदा मुंबईकरांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन केले आहे. नियम तोडणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे.
ई-चलनांची संख्या : वाहतूक विभागाचे सह पोलीस आयुक्त प्रवीण पडवळ यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले की, आम्ही दर दिवसाला दहा हजार ई-चलन जारी करतो. वाहतुकीच्या नियमांच्या उल्लंघनांमुळे वाहतुकीची समस्या निर्माण होणार नाही. तसेच रस्ते अपघात होणार नाहीत. यावर आमचा फोकस असल्याची माहिती पडवळ यांनी दिली आहे. मुंबईत गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी सात महिन्यांत वाहन चालकांकडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. सीट बेल्ट न लावणे, मद्यपान करून वाहन चालविणे, चुकीच्या बाजूने वाहन चालविणे आणि जादा भाडे आकारणे, हेल्मेट न घालणे यांसारख्या गुन्ह्यांसाठी वाहतूक पोलिसांनी चालकांना जारी केलेल्या ई-चलनांची संख्या मागील वर्षाच्या आकडेवारीपेक्षा कमी आहे.
वाहतूक नियम उल्लंघन तपासणीसाठी मोहीम : वाहतूक पोलिसांच्या म्हणण्यानुसार, प्रवाशांच्या विविध तक्रारी आणि शहरातील रस्ते अपघातांची संख्या, यामुळे या वर्षी त्यांचे लक्ष या समस्यांवर आहे. वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, वाहतूक नियम उल्लंघन तपासणीसाठी मोहीम राबविण्यात आली. यामध्ये मद्यपान करून वाहन चालविणे, सीट बेल्ट न लावता वाहन चालविणे, चुकीच्या बाजूने म्हणजेच विरुद्ध दिशेने वाहन चालविणे अशा अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
एकूण 539 गुन्हे दाखल : गेल्या वर्षी मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांची संख्या 38 होती. तर विनासीट बेल्टप्रकरणी 1 लाख 21 हजार 526 कार चालकांवर कारवाई करण्यात आली होती. विरुद्ध बाजूने वाहन चालविणाऱ्या 6 हजार 370 जणांवर कारवाईचा बगडा उचलला होता. ऑटोरिक्षा-टॅक्सी चालकांकडून जादा भाडे आकारण्यासाठी जारी केलेले ई-चलनाची संख्या शून्य होती. हेल्मेट न घालणाऱ्या 6 लाख 88 हजार 655 दुचाकी स्वारांवर वाहतूक विभागाने कारवाई केली होती. तर यावर्षी जुलैपर्यंत विनासीट बेल्टप्रकरणी 1 लाख 31 हजार 327 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. तर ई-चलन दंडाची दोन कोटी 62 लाख 60 हजार 200 इतकी रक्कम वसुल करण्यात आली आहे. विरुद्ध बाजूने वाहन चालवणाऱ्या 25 हजार 724 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. ऑटोरिक्षा-टॅक्सी चालकांकडून जादा भाडे आकारण्यासाठी 806 ई-चलान जारी करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे एकूण 539 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मृत्यूबाबत जनजागृती करणे आवश्यक : वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर कठोर शिक्षा व्हायला हवी. संपूर्ण शहरात पादचाऱ्यांच्या मृत्यूबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे. रस्ता ओलांडण्यासाठी भुयारी मार्ग उपलब्ध असलेल्या पादचाऱ्यांना दंड आकारत आहोत. या वर्षी जानेवारी ते जून या कालावधीत शहरात 121 जीवघेणे रस्ते अपघात झाले आहेत. ज्यामध्ये 132 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती वाहतूक विभागाचे सह पोलीस आयुक्त प्रवीण पडवळ यांनी दिली आहे.
हेही वाचा :