मुंबई - विलेपार्ले पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र काणे यांनी आपल्या राहत्या घरी तिसऱ्यांदा पोलिसांच्या गणवेशातील अतिशय मनमोहक बाप्पाची प्रतिष्ठापणा केली आहे. यंदा वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे संदेश देणारा पोलिसांच्या वर्दीतील बाप्पा काणे यांच्या घरी विराजमान झाला आहे.
राजेंद्र काणे यांनी पोलिसांच्या वर्दीतील श्रीगणेशाच्या मूर्तीला सिंबा या व्यक्तीरेखेचे नाव दिले आहे. सिंबा हा पोलिसांच्या बाईकवर बसून संपूर्ण मुंबईत फिरुन नागरिकांना वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे संदेश देत जनजागृती करीत आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलारसह अनेक मान्यवरांनी या पोलीस बाप्पाला शुभेच्छा देत याच्या माध्यमातून वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचा संदेश दिला आहे.
दरवर्षी भारतात सुमारे दीड लाख लोक रस्ते अपघातात मरण पावतात. त्यातील १३ हजार मृत्यू हे फक्त महाराष्ट्र्रातील आहे. हा आकडा पाहता वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे किती आवश्यक आहे. याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी यंदा ही थीम साकारल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र काणे यांनी सांगितले.
आज सर्वत्र गणेशोत्सव साजरा केला जातो, त्यात पोलीस दलातील अधिकारी काणे यांनी समाज प्रबोधनाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. असा संदेश गणोशोत्सवातून आला तर त्याला भक्तीने पालन केले जाते. स्वसंरक्षणसाठी नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक असल्याचे शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी म्हटले आहे.