मुंबई : आजही गावाकडे गेले की जुनी वृद्ध माणसे सांगतात आमच्यावेळी दहा पैसे चालायचे. आता काहीतरीच महागाई वाढली आहे. दहा पैशात आम्ही एवढे चणे घ्यायचो. पण, हे दहा पैसे 25 पैसे पाच पैसे कसे दिसायचे हे आजच्या पिढीला माहीत नाही. कारण हे पैसे चलनातून बंद होऊन जवळपास 25 ते 30 वर्षाच्या कालखंड मध्ये गेला आहे. त्यामुळे ही नाणी आजकाल बघायला देखील मिळत नाहीत. मात्र, तुम्ही कधी विचार केला आहे का? या जुन्या नाण्यांची दागिने होऊ शकतात? या नाण्यांचे दागिने घालण्याची परंपरा बंजारा समाजात आहे. आणि त्यांनी ही परंपरा आजही टिकवून ठेवली आहे. नेमके कसे बनवले जातात हे दागिने? बंजारा समाजासाठी या दागिन्यांचे महत्त्व काय? या दागिन्यांना आज बाजारात मागणी आहे का?
बचत गटाच्या माध्यमातून दागिन्यांची निर्मीती: महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत न्यू बंजारा हस्तकला उत्पादक महिला बचत गट चालवणारे सुनील राठोड यांनी याबाबत माहिती दिली आहे. सुनील राठोड हे त्यांच्या महिला बचत गटाच्या माध्यमातून आजही हे पारंपरिक दागिने बनवतात आणि त्यांची विक्री करतात. राठोड यांच्या या बचत गटाच्या माध्यमातून बंजारा घागरा, चोली, जॅकेट, बॅग, जुन्या नाण्यांची ज्वेलरी अशा विविध वस्तू बनवल्या जातात.
पारंपरिक पोशाखाचा वापर: पारंपारिक हस्तकलांची माहिती देताना सुनील राठोड यांनी सांगितले की, बंजारा समाजाचा पोशाख हा जवळपास सर्वांना चित्रपटाच्या माध्यमातून माहिती आहे. मात्र, आमच्या समाजाच्या महिला मागची काही वर्षानुवर्ष हा पोशाख घालत आहेत. या पोशाखावर छोटे आरसे, नाणी, टिकल्या, मणी अशा विविध वस्तू लावलेल्या असतात. जसजसा समाज शिकत गेला तस तसा हा पोशाख वापरणे कमी झाले. आजही गावाकडे ज्या जुन्या महिला आहेत किंवा ज्या अति ग्रामीण भागातील महिला आहेत त्या हा पोशाख वापरताना दिसतात. मात्र, या पोशाखाला चित्रपटांमध्ये मालिकांमध्ये मागणी आहे.
पारंपरिक दागिने पोशाखांचे आकर्षक: पुढे बोलताना राठोड यांनी सांगितले की, बंजारा समाज हा आर्थिक परिस्थितीने आजही मागास आहे. यातून बाहेर पडण्यासाठी आम्ही साधारण दहा ते पंधरा महिलांना एकत्र घेऊन महिला बचत गट सुरू केला. या बचत गटाला शासनाचे अर्थसहाय्य लाभले. यातून आम्ही आमचे पारंपारिक पोशाख आणि दागिने हे विविध प्रदर्शनांमध्ये, महोत्सवांमध्ये मांडू लागलो. या प्रदर्शनांमध्ये आम्हाला कळले की आमच्यासाठी पारंपरिक असणारा पोशाख इतरांसाठी मात्र आकर्षण आहे. आणि हा पोशाख घालणे अनेक जण पसंत करतात. हे लोक विविध सण, समारंभ आणि कार्यक्रमांमध्ये आमचा पोशाख परिधान करतात.
मोठ्या प्रमाणात खरेदी: राठोड पुढे म्हणाले की, औरंगाबादला एक प्रदर्शन भरले होते. या प्रदर्शनात एक व्यक्ती आमच्या स्टॉलवर आली आणि त्यांनी आमच्या पोशाखा बाबत माहिती विचारली. आम्ही आमच्या परंपरेची आणि पोशाखाची माहिती त्यांना दिली. त्यावर त्यांनी खुश होऊन आमचे सर्व पोशाख खरेदी केले. त्यावेळी आमच्या स्टॉलवर बारा पोशाख उपलब्ध होते. त्यांनी पोशाख आणि दागिने या वस्तू खरेदी केल्या. 6000 रुपये एक पोशाख या किमतीने त्यांनी 12 पोशाख खरेदी केले. सोबतच आमचे पारंपरिक पैशांचे दागिने देखील त्यांनी खरेदी केले. इतके पोशाख विकत घेणारी व्यक्ती कोण आहे हे आम्हाला माहिती नव्हते. मात्र, नंतर आम्हाला कळले की ज्या व्यक्तीने हे पोशाख खरेदी केलेत ती एक फॅशन डिझायनर आहे. आणि ती व्यक्ती विविध चित्रपट आणि मालिकांसाठी पोशाख डिझाईन करते.
जुनी नाणी शोधणे एक टास्क: आमच्या या अनुभवानंतर आम्ही अधिक प्रमाणात महोत्सव आणि प्रदर्शन करायला लागलो. आम्ही जे जुन्या नाण्यांपासून पारंपारिक दागिने बनवतो या दागिन्यांना देखील मोठ्या प्रमाणात मागणी आहे. या दागिन्यांसाठी जुनी नाणी गोळा करणे हे सुरुवातीला आमच्यासाठी एक टास्क होते. मात्र, आजही जुन्या नाण्यांचे बरेच जण शौकीन आहेत. त्यांच्याकडे आम्हालाही नाणी मिळतात. फक्त थोडी शोधाशोध करावी लागते. हे दागिने बनवणाऱ्या अनेक कुशल कामगार महिला आमच्या गावात आहेत. सोबतच काही सोनार देखील या महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी आम्हाला मदत करतात.
अधिक महिलांना रोजगार: पुढे बोलताना राठोड यांनी सांगितले की, आज आमच्या या दागिन्यांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. सुरुवातीला दहा महिला आणि साधारण 15,000 रुपये आर्थिक सहाय्य इतक्या भांडवलात सुरू झालेला आमचा व्यवसाय आज मोठ्या प्रमाणात पसरला आहे. आज घडीला साधारणपणे 100 हुन अधिक महिला आमच्या गटासोबत जोडल्या गेल्या आहेत. आणि बचत गटाचे उत्पन्न हे काही लाखांच्या आसपास गेल आहे. त्यामुळे यातून महिलांना पैसे देखील मिळतात आणि आमची परंपरा देखील टिकून आहे.