मुंबई - मुंबईत येणाऱ्या पर्यटकांना आता चित्रपट, टीव्ही मालिका इत्यादींचे प्रत्यक्ष चित्रीकरणाच्या ठिकाणी जाऊन चित्रीकरण (लाईव्ह शुटींग) पाहण्याची तसेच कलाकारांसमवेत संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन संचालनालय व स्टारक्राफ्ट मनोरंजन प्राईम लिमिटेड यांच्यामध्ये पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री अदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. या सामंजस्य करारांमुळे राज्यातील पर्यटनाला चालना मिळणार असल्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
कृषी पर्यटन केंद्र
राज्यातील प्रमुख पर्यटनस्थळांवर त्या ठिकाणांचा इतिहास, वैशिष्ट्ये आदींची माहिती देणारे ऑफलाइन क्यूआर कोडचे फलक लावण्यात येणार असून यासाठी पोलक्स स्टार एलएलपी यांच्यासमवेत सामंजस्य करार करण्यात आला. मुंबईत पुढील महिन्यात होणाऱ्या 'दी मुंबई फेस्टीव्हल'संदर्भात तसेच राज्यातील खाद्यसंस्कृतीला चालना देणारे सामंजस्य करारही यावेळी करण्यात आले. याशिवाय राज्यात विविध भागात सुरू झालेल्या कृषी पर्यटन केंद्रांना नोंदणी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या या कार्यक्रमास आमदार दीपक केसरकर, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील, पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर यांच्यासह सामंजस्य करार करण्यात आलेल्या विविध संस्थांचे प्रतिनिधी, कृषी पर्यटन केंद्रचालक उपस्थित होते.
लाईव्ह फिल्म शुटिंग
बॉलिवूड हे देशासह जगभरातील पर्यटकांसाठी अत्यंत आकर्षणाचा विषय आहे. त्यामुळे लाईव्ह फिल्म शुटिंग बघण्यास मिळणे ही पर्यटकांसाठी पर्वणी ठरणार आहे. यासाठी खास तयार करण्यात आलेल्या बसचाही यावेळी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. या बसच्या माध्यमातून पर्यटकांना प्रत्यक्ष चित्रपट, टिव्ही मालिका आदींचे चित्रीकरण पहायला मिळणार आहे. याशिवाय मुंबईत यापूर्वी चित्रपटांचे जे शुटींग झाले त्या स्पॉटवर उतरण्यापूर्वी बसमध्ये त्या चित्रपटातील त्या स्थळाचा भाग दाखवून नंतर ते स्थळही दाखविले जाईल. पेडर रोड येथील फिल्म डिव्हिजनचे फिल्म संग्रहालय दाखविले जाईल. तसेच हॉलीवूडमध्ये लॉस अँजेलीस–बेव्हरली हिल्सची टूर केली जाते. त्याप्रमाणे वांद्रे (पश्चिम), जुहू, लोखंडवाला, सातबंगला या भागांमधून प्रमुख सेलिब्रेटी कलाकारांचे बंगले, निवासस्थाने दाखविली जातील. एकंदरीतच संपूर्ण चित्रपटसृष्टी पर्यटनाचा अनुभव या टूरद्वारे केला जाईल.
फुड लाईफसोबत सामंजस्य करार
राज्यातील खाद्यसंस्कृतीस चालना देण्यासाठी तसेच स्थानिक व घरगुती पदार्थ पर्यटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी फुड लाईफसोबत सामंजस्य करार करण्यात आला. यामुळे पर्यटकांना अधिकृत महाराष्ट्रीय खाद्यपदार्थ मिळण्यास मदत होणार आहे. राज्यातील पर्यटनस्थळांची माहिती, रस्त्यांना व चौकांना दिलेल्या नावांचा इतिहास यांचा ऑफलाइन क्युआर कोड बनवून पर्यटकांना ती माहिती उपलब्ध करून देण्यासाठी पोलक्स स्टार एलएलपी यांच्यासोबत सामंजस्य करार करण्यात आला. तसेच मुंबई फेस्टिवलसाठी एक्सप्लोरबी प्रा. लि. यांच्यासोबत सामंजस्य करार करण्यात आला. मुंबईमध्ये 25 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2021 या कालावधीत या फेस्टीव्हलचे आयोजन करण्यात येणार आहे.
सामंजस्य करारांविषयी अधिक माहिती
खाद्यपदार्थांचा अनुभव महत्वाचा भाग आहे. सध्या हॉटेलमध्ये कमी ठिकाणी महाराष्ट्रीय खाद्य पदार्थ मिळतात. याबाबत फुड लाईफसोबत सामंजस्य करार करण्यात आला. यामाध्यमातून होम शेफचे जाळे निर्माण करण्यात येणार आहे. प्रत्येक डेस्टिनेशनवर किमान दहा होम शेफ आणि वर्षभरात तीन हजार होम शेफ तयार करण्यात येणार आहेत. एफडीएमार्फत स्वच्छता, हायजिन आदींचे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे.
महाराष्ट्र गाईड कोड
राज्यातील किल्ले, गुंफा, ट्रेकींग साईटस् आदी ठिकाणी माहिती उपलब्ध नसते. काही दुर्गम ठिकाणी इंटरनेटची कनेक्टिव्हीटी नाही, अशा ठिकाणी ऑफलाईन चालणारा क्यूआर कोड असलेला बोर्ड एंट्री पॉईंटजवळ लावला जाईल. इंग्रजी व मराठीत माहिती मोबाईलवर उपलब्ध होईल. केवळ क्यूआर कोड स्कॅन करुन माहिती मिळेल. तसेच ही माहिती ऑडीओ फॉर्मही मोबाईलवर ऐकता येईल. सध्या 376 ठिकाणी हे क्यूआर कोड असलेले बोर्ड लावण्यात येणार आहेत.
मुंबई फेस्टीवल
मुंबईमध्ये पुन्हा पर्यटनाला सुरुवात करताना हॉटेल्स, रेस्टॉरंटस्, मॉल, डे टूर ऑपरेटर्स यांचेबरोबर समन्वय करुन चैतन्य निर्माण करण्यासाठी उपक्रम राबविला जाणार आहे. दि. 25 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2021 या कालावधीत सवलतीच्या दरामध्ये रिसॉर्ट, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, मॉलमधील काही वस्तू पर्यटकांना उपलब्ध करुन दिल्या जातील. एमटीडीसीसोबत हॉटेल्स व रिसॉर्ट हे सवलतीच्या दरामध्ये मिळणेसाठी समन्वय केला जाणार आहे. मुंबईतील किल्ले, गुंफा आदी ठिकाणी छोटे कार्यक्रम घेतले जाणार आहेत.
कृषी पर्यटन धोरण
महाराष्ट्रामध्ये कृषी पर्यटनाला चालना देण्याचा पर्यटन संचालनालयाचा मानस आहे. त्याचबरोबर एमटीडीसीच्या माध्यमातून त्यांना मार्केटिंगसाठी बुकींग सुविधा उपलब्ध करुन दिले जाईल.
हेही वाचा - ब्रिटनवरून परतलेले 12 पैकी 6 रुग्ण झाले बरे
हेही वाचा - गुड न्यूज : नव्या कोरोनाचा अद्याप महाराष्ट्रात शिरकाव नाही