मुंबई - राज्यात विधानसभेच्या २८८ जागांसाठी २१ तारखेला मतदान पार पडले. राज्यात सरासरी ६१.१३ टक्के मतदान झाल्याची अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी माहिती दिली आहे. तर, सातारा लोकसभेसाठी ६७.१५ टक्के मतदान झाले असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली.
मतदानाची अंतिम आकडेवारी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने जाहीर केली. राज्यात ४ कोटी ६८ लाख ६५ हजार ३८५पुरुष, तर ४ कोटी २८ लाख ३५ हजार ३७४ स्त्रिया आणि २ हजार ६३७ तृतीयपंथी अशा एकूण ८ कोटी ९७ लाख ३ हजार ३९६ मतदारांपैकी एकूण ५ कोटी ४८ लाख ३८ हजार ५१४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाचा हक्क बजावलेल्यांमध्ये २ कोटी ९४ लाख ७३ हजार १८४ पुरूष, २ कोटी ५३ लाख ६४ हजार ६६५ स्त्रिया आणि ६६६ तृतीयपंथींचा समावेश आहे. या निवडणुकीत ६२.८९ टक्के पुरुष, ५९.२१ टक्के स्त्रिया आणि २५.२६ टक्के तृतीयपंथींनी मतदानाचा हक्क बजावला, अशी माहितीदेखील शिंदे यांनी यावेळी दिली.
सातारा लोकसभेसाठी ६७.१५ टक्के मतदान -
सातारा लोकसभा मतदारसंघासाठीचे पुरुष, स्त्री, तृतीयपंथी आणि एकूण मतदार तसेच मतदानाचा हक्क बजावेले मतदार यांची आकडेवारीही यावेळी शिंदे यांनी सांगितली. सातारा लोकसभा मतदारसंघात पुरुष- ९ लाख ४० हजार ७५१ पैकी ६ लाख ४५ हजार २४८, स्त्रिया - ९ लाख ९ हजार ४९७ पैकी ५ लाख ९४ हजार २८७, तर तृतीयपंथी- १४५ पैकी १३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यांची एकूण संख्या १८ लाख ५० हजार ३९३ आहे. या निवडणुकीत पुरुष ६८.७१, स्त्रिया - ६५.५६ तर तृतीयपंथी- २७.८३ याप्रमाणे एकूण ६७.१५ टक्के मतदारांनी मतदान केले आहे.