- पालघर /विरार - वसई विरारमध्ये शुक्रवारी सकाळपासून विविध ठिकाणी ईडीचे धाडसत्र सुरू आहे. आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या विरारमधील नामांकित विवा ग्रुपची ईडीच्या माध्यमातून चौकशी सुरू करण्यात आली आहे. विरार पश्चिम रेल्वे स्थानक परिसरातील विवा सुपर मार्केटमधील विवा ग्रुपच्या कार्यालयात ही चौकशी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
सविस्तर वाचा - BREAKING: आमदार हितेंद्र ठाकुरांच्या विवा ग्रुपवर ईडीची धाड
- नाशिक - नाशिक महापालिकेतील गटनेता कार्यालयाला आग लागल्याची धक्कादायक घटना गुरुवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली आहे. राजीव गांधी भवन येथील शिवसेनेचे गटनेते विलास शिंदे यांच्या दुसऱ्या मजल्यावरील कार्यालयाला ही आग लागली असून शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
सविस्तर वाचा - नाशिक महानगरपालिका कार्यालयाला आग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल
- कोल्हापूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मलाही मुख्यमंत्री व्हावं वाटतय या इच्छेवर पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मिश्किल प्रतिक्रीया दिली आहे. त्यांना प्रश्न विचारण्यात आला की जयंत पाटील यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे. त्यावर पवार म्हणाले मग त्यात काय झालं. त्यांना शुभेच्छा...ते एवढ्यावर थांबले नाहीत त्यांनी पाटलांची फिरकी घेत उद्या मलाही वाटेल मुख्यमंत्री व्हावं, कोणी करणार का? असे सांगत एक सुचक इशारही दिला. ते कोल्हापूरमध्ये बोलत होते.
सविस्तर वाचा - उद्या मलाही वाटेल मुख्यमंत्री व्हावं! कुणी करणार का?
- मुंबई - कोरोना लसीकरणासाठी भारताने शेजारी देशांसह मित्र देशांना लसीचा पुरवठा सुरू केला आहे. म्यानमार, सेशल्स आणि मॉरिशस या देशांना आज (शुक्रवार) सीरम कंपनीच्या 'कोव्हिशिल्ड' लसीचा पुरवठा करण्यात आला. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरून ही लस या देशांना पाठविण्यात आली. नेपाळ, भूटान, अफगाणिस्तान, बांगलादेशलाही भारताकडून कोरोना लस देण्यात येत आहे.
सविस्तर वाचा - भारताकडून कोव्हिशिल्ड लस म्यानमार, मॉरिशसला विमानाने रवाना
- कोल्हापूर - जर अजित पवारांचा जयंत पाटील मुख्यमंत्री व्हावे, यासाठी पाठिंबा असेल तर आमचा पाठिंबा नसण्याचे कारण नाही. आपल्या पक्षाचा, आपल्या विचारांचा मुख्यमंत्री व्हावा, अशी इच्छा असण्यात गैर काय? अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. असे वक्तव्य करून त्यांनी एका अर्थी जयंत पाटील यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्याला पाठींबाच दिला असल्याची चर्चा होत आहे.
सविस्तर वाचा - जयंत पाटील यांच्या 'त्या' वक्तव्याला सुप्रिया सुळेंचाही पाठिंबा
- मुंबई - सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात केलेली बलात्काराची तक्रार मागे घेण्यात आली आहे. रेणू शर्मा यांनी ही तक्रार केली होती. तक्रार मागे घेतल्याने मुंडे यांना दिलासा मिळाला आहे.
सविस्तर वाचा - दिलासा! धनंजय मुंडे यांच्या विरोधात केलेली बलात्काराची तक्रार मागे
- नवी मुंबई - सीबीडी बेलापूर येथील पोलीस आयुक्तालयासमोर एका तरुणाने स्वत:च्या अंगावर डिझेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी संबंधित तरुणाला सीबीडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नितीन रांजणे असे या तरुणाचे नाव आहे.
सविस्तर वाचा - नवी मुंबई पोलीस आयुक्तालयासमोर तरुणाचा अंगावर डिझेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न
- बारामती- अनैतिक संबंधाच्या संशयावरून एका 23 वर्षीय युवकाचा त्याच्या चार मित्रांनी धारदार शस्त्राने दोन्ही हात पाय व मुंडके तोडून निर्घुण खून केल्याची धक्कादायक घटना इंदापूर तालुक्यातील गणेशवाडी येथे घडली. संजय महादेव गोरवे वय 23 (रा.टाकळी, टेंभुर्णी ता.माढा जि सोलापूर) असे मृत युवकाचे नाव आहे.
सविस्तर वाचा - अनैतिक संबंधाच्या संशयावरून तरुणाचा खून, इंदापूर तालुक्यातील घटना
- मुंबई - प्रसिद्ध इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचे पुढील बिझनेस डेस्टिनेशन गुजरात असू शकते. गुजरात मुख्यमंत्री कार्यालयाचे उच्च अधिकारी व टेस्ला कंपनीचे उच्च अधिकारी सध्या एकमेकांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे. बंगळुरू येथे संशोधन केंद्र स्थापन केल्यानंतर टेस्ला गुजरात, तामिळनाडू, आंध्र प्रदेशसह काही राज्यांमध्ये आपले कारखाने उभारण्यासाठी योग्य जागा शोधत आहे.
सविस्तर वाचा - टेस्लाचे पुढील बिझनेस डेस्टिनेशन गुजरात? जाणून घ्या कारणे
- शिमोगा - कर्नाटक राज्यातील शिमोगा जिल्ह्यात जिलेटीन साठ्याचा मोठा स्फोट झाला. स्फोटात कमीत-कमी आठ जण ठार झाल्याची माहिती मिळत आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा स्फोट जिलेटीन काड्यांनी भरलेल्या ट्रकमध्ये झाल्याचे सांगितले जात आहे. या स्फोटामुळे भुकंपासारखे धक्के जाणवले व अनेक घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. हा स्फोट गुरुवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास झाला.
सविस्तर वाचा - कर्नाटकातील शिमोग्यात जिलेटीनने भरलेल्या ट्रकमध्ये भीषण स्फोट, आठ जण ठार
- पुणे - पुण्याच्या मांजरी भागातील सीरम इंस्टिट्यूटमध्ये लागलेली आग आटोक्यात आली आहे. सध्या अग्निशामन दलाकडून कुलींगचे काम सुरू आहे. या आगीत शेवटच्या मजल्यावर अडकलेल्या 5 जणांच्या मृत्यू झाला आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली आहे. आज दुपारी एकच्या सुमारास ही आग लागली होती. त्यानंतर अग्निशामन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. आग विझल्यानंतर आग लागलेल्या इमारतीच्या शेवटच्या मजल्यावर पुन्हा एकदा आग लागली होती. पण ती तात्काळ आटोक्यात आणण्यात आली आहे. दरम्यान, पुणे गुन्हे शाखा याबाबतचा समांतर तपास करणार आहे.
सविस्तर वाचा - Serum Institute Fire : 'सीरम'च्या आगीत पाच जणांचा होरपळून मृत्यू; कोव्हिशिल्ड लस सुरक्षित