मुंबई - सेल्फी काढणे जीवावर बेतल्याची घटना पालघरमध्ये घडली आहे, सेल्फी काढताना धबधब्यात बुडून ५ तरुणांचा मृत्यू झाला.. बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध कोरियोग्राफर सरोज खान यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.. यूपीच्या कानपूरमध्ये एका कुख्यात गुंडासोबत झालेल्या चकमकीत ८ पोलिसांचा मृत्यू झाला आहे... यासह इतर महत्वाच्या १० बातम्यांचा थोडक्यात आढावा..
मुंबई - सुप्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांचे आज निधन झाले. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी पहाटे १ वाजून ५२ मिनिटांनी हृदय विकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला.
वाचा सविस्तर -सुप्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांचे निधन
कानपूर - येथील आरोपी आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत 8 पोलिसांना वीरमरण आले आहे. तसेच पोलीस अधिकारी बिठूर यांच्यासह 6 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. वीरमरण आलेल्यांमध्ये पोलीस अधिकारी बिल्हौर देवेंद्र मिश्र, पोलीस अधिकारी शिवराजपूर महेश यादव, एका पोलीस निरीक्षकासह 5 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
वाचा सविस्तर -यूपीमध्ये कुख्यात आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पथकावर गोळीबार; 8 पोलिसांना वीरमरण
पालघर - सेल्फी काढण्याच्या नादात दोन तरुण मुलं काळ मांडवी धबधब्यात पडले. तेव्हा त्यांना वाचवण्यासाठी आणखी तीन मुलं पाण्यात उतरली. मात्र, दुर्दैवाने पाचही मुलांचा बुडून मृत्यू झाला. ही मुलं जव्हारमधील अंबिका चौक येथील आहेत. गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे जव्हार शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
वाचा सविस्तर - सेल्फीच्या नादात काळ मांडवी धबधब्यात 5 तरुणांचा बुडून मृत्यू
श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर जिह्यातील मालबाग परिसरात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवादी यांच्यात चकमक झाली. गुरूवारी रात्री उशिरा पर्यंत झालेल्या या चकमकीत जवानांनी एका दहशतवाद्याच्या खात्मा केला. एका जवानाला या चकमकीत वीरमरण आले.
वाचा सविस्तर -JK : चकमकीत दहशतवादी ठार, एका जवानाला वीरमरण
मुंबई - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव राज्यात दिवसेंदिवस वाढतच आहे. आज (गुरुवार) एकाच दिवशी कोरोनाच्या सर्वाधिक ६,३३० रुग्णांची नोंद झाली. या नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख ८६ हजार ६२६ वर पोहोचला आहे. सध्या राज्यात ७७ हजार २६० कोरोना रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. आज तबब्ल ८०१८ कोरोनामुक्त रुग्णांना घरी सोडण्यात आले असून कोरोनामुक्त रुग्णांची एकूण संख्या १ लाख १ हजार १७२ झाली आहे. राज्यातील कोरोना चाचण्यांचा आकडा १० लाखाच्या पार गेल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
वाचा सविस्तर -एकदिवसीय उच्चांक! राज्यात ६ हजार ३३० कोरोनाबाधितांची नोंद तर, १२५ रुग्णांचा मृत्यू
हैदराबाद - भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद म्हणजेच इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या म्हणण्यानुसार, भारताने 1 जुलैपर्यंत 90 लाख 56 हजार 173 कोरोना चाचण्या केल्या आहेत. देशात कोरोना बाधितांचा आकडा 6 लाख 4 हजार 641 इतका झाला आहे. यात 3 लाख 59 हजार 859 जण कोरोनामुक्त झाले आहे. तर 17 हजार 834 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
वाचा सविस्तर - देशभरातील कोरोनासंबंधी महत्वाच्या घडामोडी; वाचा एका क्लिकवर...
मुंबई - कोरोना विषाणूचे मुंबईत गुरूवार (दि. 2 जुलै) नवे 1 हजार 554 रुग्ण आढळून आले असून 57 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 80 हजार 262 वर पोहोचला आहे तर मृतांचा आकडा 4 हजार 686 वर पोहचला आहे. मुंबईमधून आज एकाच दिवशी 5 हजार 903 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा 50 हजार 694 वर पोहचला आहे. मुंबईत सध्या 24 हजार 882 सक्रिय रुग्णांवर मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर 63 टक्क्यांवर पोहचला असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
वाचा सविस्तर-मुंबईत 1 हजार 554 नव्या कोरोनाग्रस्तांची भर, 57 मृत्यू
मुंबई - मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अजय देशमुख यांचे गुरूवारी (ता.2 जुलै) रात्री विद्यानगरी येथील राहत्या घरी निधन झाले. मृत्यूसमयी ते ५४ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते स्वादूपिंडाच्या कर्करोगाशी झूंज देत होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, मुलगा आणि मुलगी आहे. आज (शुक्रवार) सकाळी 10 वाजता सांताकृझ येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
वाचा सविस्तर -मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अजय देशमुख यांचे निधन
सातारा - शेअर्समध्ये घोटाळा करुन वृद्धाची तब्बल 70 लाखांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दत्ता शामराव नरगुंदे (वय ७०, रा. यादोगोपाळ पेठ) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
वाचा सविस्तर - शेअर्समध्ये अफरातफर करून वृद्धाची 70 लाखांची फसवणूक; गुन्हा दाखल
हैदराबाद : प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून दक्षिण चिनी समुद्रापर्यंत चीनकडून होणाऱ्या आक्रमणांसंदर्भात जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. यावेळी ऑस्ट्रेलियाने आपल्या 2016 धोरणात्मक संरक्षण रचनेत बदल केला आहे. देशहिताविरोधातील कारवाया थोपविणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे "आवश्यक असेल तेव्हा विश्वासार्ह सैनिकी शक्तींद्वारे प्रत्युत्तर देणे" हा त्यामागील हेतू आहे. 2020 संरक्षण धोरणात्मक बदल सादर करताना पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी 270 अब्ज ऑस्ट्रेलियन डॉलरच्या दहा वर्षीय संरक्षण योजनेची घोषणा केली. या योजनेत कॅनबेरासाठी पहिल्यांदाच जमीन, समुद्र आणि हवेतील लांब पल्ल्याच्या तसेच हायपरसोनिक हल्ला करणाऱ्या क्षेपणास्त्रांचा समावेश आहे. इंडो-पॅसिफिक प्रदेशात प्रादेशिक हक्कांमुळे उद्भवणाऱ्या तणावपुर्ण परिस्थितीचे मूल्यमापन करणे, हे या नव्या संरक्षण बदलाचे मुख्य कारण आहे.
वाचा सविस्तर -इंडो-पॅसिफिक प्रदेशातील संघर्ष पेटण्याची शक्यता - ऑस्ट्रेलियन पंतप्रधान