मुंबई - मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. कोरोनाचा प्रसार काही प्रमाणात आटोक्यात आला असताना ऑगस्ट महिन्यात आलेल्या धार्मिक सणानंतर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णांचा संख्येत पुन्हा वाढ होऊ लागली होती. मात्र गेल्या काही दिवसात पुन्हा रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. आज मुंबईत कोरोनाच्या नव्या 1470 रुग्णांची नोंद झाली असून 48 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आज 1696 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. गेल्या तेरा दिवसात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 69 वरून 116 दिवस इतका वाढला असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
मुंबईत आज मृत्यू झालेल्या 48 रुग्णांपैकी 36 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 37 पुरुष तर 11 महिला रुग्ण आहेत. मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाख 48 हजार 804 वर पोहचला आहे. तर, मृतांचा आकडा 9 हजार 966 वर पोहचला आहे. मुंबईमधून आज 1696 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा 2 लाख 18 हजार 254 वर गेला आहे. सध्या मुंबईत 19 हजार 246 सक्रिय रुग्ण आहेत.
मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 88 टक्क्यांवर पोहचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 115 दिवस, तर सरासरी दर 0.60 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 620 चाळी आणि झोपडपट्टी कंटेन्मेंट झोन घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच 8 हजार 518 इमारती व इमारतीच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. तर, कोरोनाचे निदान करण्यासाठी 14 लाख 23 हजार 160 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.