कल्याण डोंबिवली (ठाणे) - एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाकडून उपाययोजना राबविण्यासाठी घोषणांचा पाऊस पडताना दिसत आहे. तर दुसरीकडे महापालिकेच्याच शास्त्रीनगर रुग्णालयात कोरोना स्वॅब (घशातील स्त्राव) चाचणीसाठी रुग्णांनी भर पावसात रांग लावत गर्दी करुन सामाजिक अंतराच्या नियमांला हरताळ फासल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
वाचा सविस्तर - धक्कादायक..! कोरोना 'स्वॅब टेस्टिंग'साठी भर पावसात रांग; सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा
नवी दिल्ली - पाकिस्तानने 20 हजार सैनिक उत्तर लडाख सीमेवर हलवले असून, चीनही काश्मिरमधील दहशतवाद्यांशी संवाद करत असल्याची धक्कादायक बाब सुत्रांच्या हवाल्याने समोर आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चीन आणि पाकिस्तान एकत्र झाल्याचे समजत आहे. जे की भारतासाठी धोक्याची घंटी असल्याचे मानले जाते. चीनने वेळोवेळी पाकिस्तानला मदत केली आहे. आता पाकिस्तान चीनच्या मदतीला धावून आला आहे. या पार्श्वभूमीवर चीन आणि पाकिस्तान या देशातील संबंधावर प्रकाश टाकणाऱ्या घटकांवर चर्चा करूया.
वाचा सविस्तर - भारताविरोधात चीन आणि पाकिस्तान पुन्हा एकत्र; 'ही' आहेत कारणे
पालघर - वसई महापालिकेकडून कोरोना रुग्णांबाबतीत होणारा हलगर्जीपणा समोर आला आहे. चक्क एकाच रुग्णवाहिकेतून ८ ते १० रुग्णांना कोंबून नेल्याचा धक्कादायक प्रकार नालासोपाऱ्यात उघडकीस आला आहे.
वाचा सविस्तर - एकाच रुग्णवाहिकेत 8 ते 10 जणांना कोंबले; रुग्ण आणि संशयित एकत्रच रुग्णालयात
नाशिक - अभिनेता अक्षय कुमारने नाशिकचा केलेला हेलिकॉप्टरचा दौरा वादात सापडला आहे. कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर आणि पावसाच्या दिवसात हेलिकॉप्टरला परवानगी देणे योग्य आहे का? राज्यात मुख्यमंत्र्यासह एकाही मंत्र्याला हेलिकॉप्टरची सुविधा मिळत नसताना अक्षय कुमारला नाशिक जिल्हा प्रशासनाने व्हीआयपी सुविधा कशी दिली? याची चौकशी होणार असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
वाचा सविस्तर - अभिनेता अक्षय कुमारच्या हेलिकॉप्टरला दिलेली परवानगी वादात.. छगन भुजबळांनी दिले चौकशीचे आदेश
हैदराबाद - पंतप्रधान मोदींनी भारत-चीन सीमावादाच्या पार्श्वभूमीवर काल(शुक्रवार) लडाखमधील भारताच्या निमू या सीमेवरील चौकीला भेट दिली. लष्कराचे मनोबल वाढविण्यासाठी मोदींनी लडाखला भेट देवून अप्रत्यक्षरित्या चीनच्या विस्तारवादी धोरणावर टीका केली. मात्र, मोदींनी भाषणात चीनचा नामोल्लेख टाळला. त्यावरून एमआयएम पक्षाचे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवैसींनी मोदींना फटकारले. भाषणात चीनचे नाव घेण्यात मोदींना संकोच कसला? असा सवाल त्यांनी केला.
वाचा सविस्तर - 'लडाखमधील भाषणात चीनचं नाव घेँण्यास मोदींना संकोच का?'
श्रीनगर - जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील राजौरी जिल्ह्यात सुरक्षा दलांनी दहशतवादी तळ उद्ध्वस्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे. काश्मीर पोलीस आणि राष्ट्रीय रायफल्सच्या संयुक्त पथकाने जिल्ह्यातील थानामंडी भागातील दर्दसन या खेडेगावात ही कारवाई केली.
वाचा सविस्तर - काश्मिरात दहशतवादी तळ उद्ध्वस्त; चिनी बनावटीचे ग्रेनेड, पिस्तुलांसह मोठा शस्त्रसाठा जप्त
नवी मुंबई - विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (शनिवार) कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पनवेल आणि नवी मुंबईचा दौरा केला. सदर भागात भेट देऊन फडणवीस यांनी तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यासंदर्भात रुग्णालय प्रशासन आणि महापालिका प्रशासनाशी चर्चा केली. यावेळी माध्यमांसोबत बोलताना त्यांनी, महाविकासआघाडी सरकारमध्ये समन्वयाचा अभाव दिसत आहे. त्यांनी आपापसातील समन्वय वाढावावा, असे फडणवीस यांनी म्हटले.
वाचा सविस्तर - नवीन गाड्या घेणे, ही आता प्राथमिकता असूच शकत नाही; फडणवीसांचा सरकारवर निशाणा
मुंबई - मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाची वाट महाविकास सरकारच्या काळात कोरोनामुळे खडतर झाली आहे. लॉकडाऊन काळात या प्रकल्पाचे काम मे पासून सुरू झाले खरे, पण 50 टक्के मजूरांची कमतरता असल्याने काम संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे आता या प्रकल्पास मुदतवाढ द्यावी लागणार असून प्रकल्प पूर्णत्वास मोठा विलंब होणार आहे.
वाचा सविस्तर - समृद्धी महामार्गाची वाट 'खडतर'; कोरोनाच्या विळख्याने कामाला संथगती
मनमाड - कोरोनामुक्तीकडे वाटचाल करणाऱ्या मनमाड शहरात 15 नवे रुग्ण आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. 3 जणांचा शहरात मृत्यू झाल्याने नागरिक धास्तावले आहेत. शहरातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 83 झाली आहे. तर यापैकी 50 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या 30 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.
वाचा सविस्तर - मनमाडला कोरोनाचा कहर; शहरात आढळले 15 नवीन कोरोनाबाधित, एकूण आकडा 83
गडचिरोली - एटापल्ली तालुक्यातील येलदडमी जंगल परिसरात नक्षल व सी-60 जवानांमध्ये शुक्रवारी (दि. 3 जुलै) सायंकाळी चकमक झाली. या चकमकीत एका नक्षलवाद्याला कंठस्नान घालण्यास जवानांना यश आले. शनिवारी (दि. 4 जुलै) मृत नक्षलवाद्याची ओळख पटली असून तो पेरमिली दलमचा कमांडर सोमा उर्फ शंकर असल्याची माहिती पोलीस विभागाने दिली आहे. ठार झालेल्या शंकरवर गंभीर स्वरूपाचे 15 गुन्हे असल्याने शासनाने त्याच्यावर आठ लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते.
वाचा सविस्तर - तब्बल आठ लाखांचे बक्षीस असणाऱ्या नक्षलवादी सोमाला कंठस्नान