अहमदनगर - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात विखे पाटील घराण्याची जोरदार चर्चा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील त्यांची पुढील राजकीय भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्यामुळे ते आता कोणती भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
शिर्डी लोकसभेसाठी कोणाचा प्रचार
शिर्डी लोकसभेसाठी काँग्रेसचा प्रचार करायचा की शिवसेना-भाजप युतीचा याचा फैसलाही आज राधाकृष्ण विखे पाटील करणार आहेत. विखे पाटील यांनी बुधवारी श्रीरामपूरमध्ये ससाणे समर्थक कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता. त्यामध्ये त्यांनी कार्यकर्त्यांची बाजू समजून घेतली आहे. राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखेंनी भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून विखे हे काँग्रेसपासून दूर गेले आहेत. लोकसभा निवडणूक प्रचारात ते जिल्ह्यात आणि राज्यात फिरकले नाहीत. उलट नगरमध्ये तळ ठोकून मुलाचा प्रचार केला. नगरची निवडणूक संपल्याने शिर्डी लोकसभेसाठी काँग्रेसचा प्रचार करायचा की इतर कोणाचा? याचा निर्णय आज राधाकृष्ण विखे जाहीर करणार आहेत.
राहुल गांधींच्या सभेला विखे पाटील उपस्थित राहणार का?
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची उद्या (गुरुवारी) संगमनेरमध्ये जाहीर सभा होणार आहे. या सभेला राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित राहणार का? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. विखेंचे पक्षांतर्गत विरोधक बाळासाहेब थोरात यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची श्रीरामपुरातच जाहीर सभा आयोजीत केली आहे. एरवी निवडणुका असल्या की सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या जिल्ह्यातील सभांचे नियोजन राधाकृष्ण विखे पाटील हे करायचे. मात्र, यावेळी काँग्रेस वर्कींग कमीटीचे सदस्य असलेल्या बाळासाहेब थोरातांनी राहुल गांधींच्या सभेचे आजोजन केले आहे.
काहीच दिवसांपूर्वी राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर सुजय यांना नगर दक्षिण लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. त्यांनतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुजय यांच्यासाठी छुपा प्रचार केल्याचे पाहायला मिळाले. मला पक्षातून बाहेर काढण्यासाठी अनेकजण प्रयत्न करत असून अनेकांनी देव पाण्यात ठेवल्याचेही विखे म्हणत विखेंनी बाळासाहेब थोरातांवर निशाणा साधला होता. तसेच काँग्रेस पक्ष हा राष्ट्रवादीच्या दावणीला बांधला असल्याचेही विखे म्हणाले.