मुंबई - विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन ६ दिवस झाले तरी अद्यापही भाजप आणि शिवसेनेने सत्ता स्थापनेचा दावा केला नाही. सरकार महायुतीच स्थापन करणार असल्याचे दोन्ही पक्षातील नेते सांगत असले तरी भाजप आणि शिवसेनेतील ५०-५० चा तिढा अद्यापही कायम आहे. अशातच भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काही पर्याय निर्माण झाला तर पाठिंबा कोणाला द्यायचा? याविषयीची चर्चा करण्यासाठी आज मुंबईत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वेगवेगळ्या बैठका होत आहेत. या दोन्ही बैठकांमध्ये काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काँग्रेसच्या सर्व प्रमुख नेत्यांची बैठकही दादर येथील टिळक भवन येथे होणार आहे. या बैठकीत राजकीय परिस्थितीवर चर्चा होणार आहे. त्यानंतर राज्यात काँग्रेसला आलेले यश आणि अपयश त्यासोबतच ज्या ठिकाणी काँग्रेस दुसर्या क्रमांकावर आली आणि काही मतांच्या फरकाने ज्या ठिकाणी काँग्रेसचा पराभव झाला अशा सर्व जागांची समिक्षा या बैठकीत केली जाणार आहे. या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण माजी प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण, माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे, राज्य प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, आमदार नाना पटोले आदी नेते उपस्थित राहणार आहेत.
राजकीय घडामोडी यासोबतच राज्यात अवकाळी आणि परतीच्या पावसामुळे कोकण, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आदी भागातील शेती पिकांचे नुकसान यावर चर्चा केली जाणार आहे. त्यासोबतच या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी तातडीच्या कोण कोणत्या उपाययोजना करता येतील, यासाठीचा पाठपुरावा सरकारकडे केला जाणार आहे.
सायंकाळी ५ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक बॅलार्ड पिअर येथे असलेल्या राष्ट्रवादी भवनात होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला यावेळी विधानसभेत ५४ जागा मिळाल्या आहेत. विधानसभेत त्यांची ताकद वाढली आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादीला मिळणार असल्याने त्याविषयी हे पद कोणाला द्यायचे ही प्रामुख्याने चर्चा केली जाणार आहे. त्यासोबतच जर भाजपला सत्तेतून दूर ठेवण्याचा पर्याय निर्माण झाला तर यासाठी कोणाला पाठिंबा देता येईल काय? अथवा सत्तेत सामील होता येईल का? यावरही राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येते.