मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज (शनिवार) अयोध्येला जाणार असून, रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत. ते सकाळी ११ वाजता विमानाने मुंबईतून लखनौकडे रवाना होणार आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यासोबत खासदार, मंत्रीही उपस्थित राहणार आहेत. मात्र, शिवसेनेच्या अयोध्या दौऱ्यावर कोरोना व्हायरसचे सावट असल्याने, उत्तर प्रदेश सरकारने सेनेला शरयू नदी किनारी महाआरती करण्यास परवानगी नाकारली आहे.
शिवसेनेचा अयोध्येचा दौरा हा नियोजित होता. मात्र, सत्ता नाट्याच्या घडामोडीत हा नियोजीत दौरा पुढे ढकलण्यात आला. ठाकरे सरकारला 100 दिवस पूर्ण झाल्यावर 7 मार्चला शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येचा दौरा करणार असल्याची घोषणा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केली होती. त्यानुसार आज (7 मार्च) मुख्यमंत्री हे अयोध्या दौऱ्यात रामजन्मभूमी येथे रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत. मात्र, शरयू नदी किनारी महाआरती होणार नाही. शिवसेनेच्या अयोध्या दौऱ्यात मोठ्या संख्येने शिवसैनीक व शिवसेना नेते रामजन्मभूमीत दाखल झाले आहेत.