मुंबई - राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. मुंबईतही कोरोना विषाणूचे रोज 600 ते 700 रुग्ण आढळून येत होते. त्यात आज मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मुंबईत आज कोरोनाचे नव्याने 998 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 16 हजार 579 वर पोहोचला आहे. तर 25 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 621 वर पोहोचल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
मुंबईत आज कोरोनाचे नवे 998 रुग्ण आढळून आले आहेत. त्यात गेल्या 24 तासात 634 रुग्ण आढळून आले आहेत. तर 11 आणि 12 मे ला खासगी लॅबमध्ये चाचणी केलेले 364 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे मुंबईमधील कोरोनाच्या रुग्णांचा आकडा 16 हजार 579वर पोहोचला आहे. तर मुंबईत 25 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 16 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 18 पुरुष आणि 7 महिला रुग्ण होत्या. मृतांमध्ये एकाचे वय 40 वर्षाखाली होते तर 14 जणांचे वय 60 वर्षाच्या वर होते. तर 10 जणांचे वय 40 ते 60 वर्षादरम्यान होते.
डिस्चार्ज रुग्णांच्या संख्येत वाढ -
मुंबईमध्ये काल 478 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला होता. आज पुन्हा 443 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे मुंबईमधील डिस्चार्ज रुग्णांची संख्या 4 हजार 234 वर पोहोचली आहे. मुंबईत दोन दिवसात मुंबईमधून डिस्चार्ज देण्यात येणाऱ्या रुग्णांचा संख्येत वाढ पाहायला मिळाली आहे.