मुंबई - लॉकडाऊन दरम्यान मालवाहू गाडीवर अत्यावश्यक सेवेचे स्टिकर लावून त्याद्वारे प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक करणाऱया तिघांवर कारवाई करण्यात आली. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने केलेल्या या कारवाईत तीन आरोपींना मुद्देमालासह अटक झाली आहे.
मुंबईतील शिवाजीनगर-गोवंडी परिसरात ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी मोहम्मद गौस झहुर अहमद खान (वय 38) , शेहजाद मोहम्मद हनिफ कुच्छी (वय 31) एस एन खान (वय 27) या आरोपींना अटक केली आहे.
7 मे ला गजानन कॉलनी येथे एक टेम्पो गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना आढळून आला होता. या टेम्पोची झडती घेतली असता 34 पिशव्यांमध्ये राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा आणि इतर तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. पोलिसांनी 53 लाख 48 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अटक केलेल्या तिन्ही आरोपींना 10 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.