मुंबई - ठाणे जिल्ह्यातील कोरोना साथीचा संसर्ग रोखणे खूप गरजेचे आहे. त्यासाठी 'ट्रॅक एन्ड ट्रेस'वर जास्तीत जास्त भर देऊन प्रत्येक रुग्णाचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे महत्त्वाचे आहे, अशी गरज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. तसेच इतर महापालिकांनी रुग्णांना बेड मिळवून देऊन त्यांच्यावर वेळेवर उपचार करावेत, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी शुक्रवारी ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासंदर्भात जिल्ह्यातील पालिका आयुक्तांची व इतर अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. बृहन्मुंबई पालिकेचे अधिकारीदेखील बैठकीला उपस्थित होते.
तसेच पालकमंत्री एकनाथ शिंदे, मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव अजोय मेहता, अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार, आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, उपायुक्त अश्विनी भिडे आदी अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा - यापुढे लॉकडाऊन नाही - राजेश टोपे
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, मुंबई तसेच इतर काही जिल्ह्यांप्रमाणे ठाणे जिल्ह्यात अधिक गांभीर्याने रुग्णांचे संपर्क शोधणे गरजेचे आहे. तसेच तातडीने त्यांच्यावर निश्चित केलेल्या कार्यपद्धतीनुसार पुढील उपचार करणे आवश्यक आहे. यासोबत बाधितांसाठी बेड्सची उपलब्धता होईल आणि त्याची माहिती गरजू रुग्णास तातडीने मिळेल हे पाहावे.
कोविड केअर केंद्रांची तीन स्तरीय रचना खूप प्रभावी आहे. यामध्ये रुग्णांचे वर्गीकरण त्यांच्या तब्येतीनुसार करून उपचार देण्यात येतात. ही रचना ठाणे जिल्ह्यात व्यवस्थित काम करणे महत्त्वाचे आहे, अशी गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली. याशिवाय डॉक्टर्स आणि परिचारिका, इतर वैद्यकीय कर्मचारी हे मनुष्यबळ संबंधित ठिकाणी लगेच कसे उपलब्ध होईल हे पाहावे, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
दरम्यान, यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोरोना साथीच्या बाबतीत करीत असलेल्या प्रयत्नांविषयी तसेच येणाऱ्या अडचणींविषयी माहिती दिली.