मुंबई - महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण घेतलेल्या राज्यातील लाखो विद्यार्थ्यांपुढे सर्वात मोठा प्रश्न रोजगाराचा आहे. याच प्रश्नावर टाटा सामाजिक संस्थेने तोडगा काढून अनेकांना रोजगारांच्या संधी उपलब्ध करुन दिल्या आहेत. मराठवाड्यातील गावखेड्यांपासून ते शहरी भागातील असंख्य विद्यार्थ्यांना नोकरीसाठी आवश्यक असलेले ज्ञान आणि त्यासाठीचे कौशल्य शिकवण्याचा अनोखा प्रकल्प टाटाने सुरू केला. त्या माध्यमातून अनेक रोजगारांच्या संधी उपलब्ध होत आहेत.
देशातील नामवंत बँका आणि कार्पोरेट संस्थांमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थीही टाटा संस्थेने दिलेल्या प्रशिक्षणानंतर नोकरीला लागले आहेत. इतकेच नव्हे, तर लाखो रूपये खर्च करून व्यावसायिक शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या तोडीसही विद्यार्थी उतरले असल्याने याविषयी केवळ राज्यातच नाही देशातील तरुणांमधून टाटा संस्थेचे कौतुक केले जात आहे.
यावेळी बोलताना प्रकल्प प्रमुख तन्मय नायक यांनी सांगितले, की देशातील ५ राज्यात हा उपक्रम सुरू केला आहे. २० हजारांहून अधिक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा कौशल्यपासून ते कार्पोरेट कंपन्यांमध्ये आवश्यक असलेले ज्ञान कौशल्य विकास कार्यक्रमातून देत आहोत. त्याचा मोठा लाभ हा विद्यार्थ्यांना नोकरीसाठी होत आहे. महाराष्ट्रात जालना जिल्ह्यातील अंबडसारख्या ठिकाणी १ हजार २८० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले. त्यातील अडीचशेहून अधिक विद्यार्थी आज चांगल्या पगाराची नोकरी करत आहेत.
मुंबईत गोवंडी, चेंबूर, मानखुर्द, देवनार, घाटकोपर अशा ठिकाणच्या महाविद्यालयातील विद्यार्थी निवडून त्यांना हे प्रशिक्षण देत आहोत. यामुळे या विद्यार्थ्यांना जगण्याची एक नवी उमेद मिळत आहे. राज्यात येत्या काळात सरकारच्या मदतीशिवाय २ हजार विद्यार्थ्यांना यापुढे प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम ठरवला आहे. त्यासाठी अमेरिकेतील जे. पी. मॉर्गन या संस्थेने सहकार्य करण्याचे आश्वासन दिले, असल्याचे नायक यांनी यावेळी सांगितले.
काय आहे उपक्रम-
टाटाकडून मागील ३ वर्षांपासून झारखंड, राजस्थान, छत्तीसगड आदी ४ राज्यांमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय विद्यापीठ विद्यार्थी कौशल्य विकास कार्यक्रम (एनयुएसएसडी) राबवण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यातही या कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे. मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यापासून ते मुंबईतील गोवंडी, चेंबूर, मानखुर्द्र, देवनार, घाटकोपर परिसरात असलेल्या महाविद्यालयांमध्ये हा टाटाचा हा उपक्रम सुरू आहे.
शेतीविषयक प्रशिक्षण देण्याचा मानस -
विद्यार्थ्यांना प्रामुख्याने त्या-त्या कंपनीला लागणारे डोमेनचे कौशल्य, भाषा कौशल्य, बँकिंग, इन्शुरन्स आणि कार्पोरेट कंपन्यांमध्ये लागणारे प्रशिक्षित मनुष्यबळ आदींचे प्रशिक्षण टाटाकडून दिले जाते. सध्या बँका, कार्पोरेट संस्था यांच्यासाठी लागणारे मनुष्यबळ आणि त्यातून नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर असला तरी भविष्यात शेतीविषयक विविध क्षेत्रासाठी टाटा विद्यार्थ्यांना कौशल्य विकासचे प्रशिक्षण देण्याचा मानस आहे.