मुंबई : उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर एका स्कॉर्पिओमध्ये जिलेटीनच्या कांड्या आढळल्याने खळबळ उडाली होती. यानंतर या प्रकरणात अनेक खुलासे होत आहेत. या प्रकरणी सचिन वाझेंना निलंबित करण्यात आले आहे. 25 फेब्रुवारीला या प्रकरणाचा तपास सचिन वाझेंकडे सोपविण्यात आला होता. यानंतर आणखी एक माहिती समोर येत आहे की, ठाण्यातील साकेत कॉम्पलेक्समध्ये सीसीटीव्ही फुटेज आपल्या ताब्यात घेतले होते. यानंतर एनआयएने ते फुटेज(डीव्हीआर) ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात आतापर्यंत नेमक्या काय घडामोडी घडल्या, याचा घेतलेला हा आढावा.
या प्रकरणात आतापर्यंत काय-काय घडले?
- 25 फेब्रुवारी - उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घरापासून काही अंतरावर एका स्कॉर्पिओ कारमध्ये 20 जिलेटिनच्या कांड्या आढळल्या.
- यानंतर या प्रकरणी तपास सुरू करण्यात आला. मुंबई पोलिसांच्या बॉम्बशोधक पथकाने याविषयी तपासाला सुरूवात केली.
- त्याच रात्री पोलिसांना याबाबत माहिती झाले की, ही गाडी व्यापारी मनसुख हिरेन यांची आहे, जी 18 फेब्रुवारीला चोरी झाली होती.
- 26 फेब्रुवारी - मनसुख हिरेन यांना चौकशीसाठी सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांनी दक्षिण मुंबईतील पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात आणले.
- 27-28 फेब्रुवारी - सचिन वाझे यांनी दुसऱ्यांदा मनसुख यांचा जबाब घेतला.
- 28 फेब्रुवारी - दहशतवादी संघटना जैश-उल-हिंदने या प्रकरणाची जबाबदारी घेतली. तसेच एक धमकीही दिली. टेलिग्राम अॅपद्वारे त्यांनी या घटनेची जबाबदारी घेतली.
- 1 मार्च - गुन्हे शाखेला माहिती झाले की, मनसुख हिरेन आणि सचिन वाझे हे दोघेही एकमेकांना आधीपासून ओळखत होते. यानंतर हे प्रकरण पोलीस उपायुक्त नितीन अल्कानुर यांच्याकडे सोपविण्यात आले.
- 3 मार्च - मनसुख हिरेन यांनी त्यांना पोलिसांनी त्रास दिल्याची तक्रार केली.
- 5 मार्च - मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळून आला. सुरूवातीला त्यांनी आत्महत्या केल्याचे म्हटले गेले. मात्र, यानंतर त्यांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.
- 6 मार्च - देवेंद्र फडणवीस यांनी वाझेंची या प्रकरणातील भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप केला. यानंतर हे प्रकरण एटीएसकडे देण्यात आले.
- 7 मार्च - याप्रकरणी एटीएसने अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
- 8 मार्च - गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर, एटीएसकडून हा तपास एनआयएकडे देण्यात आला.
- 9 मार्च - देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांचा जबाब वाचला.
- 11 मार्च - एका खासगी सायबर फर्मने सांगितले की, जैश-उल-हिंदने जो संदेश पाठविला होता, त्याचे टेलिग्राम चॅनेल दिल्लीच्या तिहार तुरुंगाच्या परिसरात बनविण्यात आले होते. यानंतर तुरुंगातील इंडियन मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्याच्या बराकीतून मोबाईल जप्त करण्यात आला.
- 12 मार्चला - पोलीस अधिकारी सचिन वाझेंची मुंबई पोलिसांतील नागरी सुविधा केंद्रात बदली करण्यात आली.
- 12 मार्च - हिरेन प्रकरणात प्राथमिक पुराव्यांच्या आधारे ठाण्यातील न्यायालयाने वाझेंचा अटकपूर्व जामीन नामंजूर केला.
- 13 मार्च - सचिन वाझेंना चौकशीनंतर एनआयएने अटक केली.
- 14 मार्च - वाझेंना 25 मार्चपर्यंत एनआयएच्या विशेष न्यायालयाने एनआयए कोठडी सुनावली.
- 15 मार्च - सचिन वाझेंना मुंबई पोलीस दलातून पुन्हा निलंबित करण्यात आले.
हेही वाचा - अँटिलिया प्रकरण: पीपीई कीट घालून सचिन वाझे, की इतर कुणी व्यक्ती