मुंबई - मंगळवारी रात्री साकिनाका येथील आनंद भुवन चाळीत गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत एकाच घरातील 6 जण जखमी झाले होते. तसेच जखमींना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या घटनेत एका 15 वर्षीय मुलीचा मृत्यूही झाला होता. आज 60 वर्षीय महिला व एका 8 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 3 झाली असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली आहे.
काय होती घटना-
साकिनाका आनंद भुवन, जरीमरी, जगताप वाडी येथील एका चाळीत मंगळवारी रात्री 9च्या सुमारास गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागली. या आगीची माहिती मिळताच मुंबई अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. अथक प्रयत्नानंतर अग्निशामक दलाने या आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत एकाच घरातील 6 जण भाजून जखमी झाले होते.
3 जणांचा झाला होता मृत्यू -
जखमींना पालिकेच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांनी जखमींना तपासले असता रुग्णालयात आणण्यापूर्वीच अलमास या 15 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. योगिता यांनी दिली. जखमी पैकी रिहान खान आणि अस्मा या दोघांना सायन रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले होते. या दोघांचा आज मृत्यू झाल्याची माहिती सायन रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. गोमती यांनी दिली. तसेच अनिस खान, सानिया या दोघांना कस्तुरबा रुग्णालयात उपाचारासाठी पाठवण्यात आले आहे. तर शिफावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा- विहंग सरनाईकबरोबर आ. प्रताप सरनाईक यांचीही आज चौकशी होण्याची शक्यता