मुंबई - टीबी आणि कुष्ठरोग याचे निदान वेळीच व्हावे यासाठी राज्यात आणि मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या घरोघरी जाऊन असंसर्गजन्य आजारांचे आणि अतिजोखमीच्या रुग्णांची शोध मोहीम घेण्यात आली होती. या मोहिमेद्वारे मुंबईत 5342 संशयित टीबी, 2362 संशयित कृष्ठरोगी रुग्ण तर 1127 जणांमध्ये कर्करोगाची लक्षणं आढळून आली. ही धक्कादायक माहिती मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाद्वारे प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात मांडली आहे.
हेही वाचा - बच्चू कडूंचा भाजपवर 'प्रहार'; शिवसेनेला दिला पाठिंबा
जागतिक दर्जाच्या शहरामध्ये इतक्या मोठ्या संख्येने टीबी, कृष्ठरोग आणि कर्करोगाचे रुग्ण आढळून आल्याने मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाद्वारे मिळालेल्या आकडेवारीनुसार, मुंबईतील 10 लाख घरांचे सर्वेक्षण करण्याचे ध्येय्य ठेवण्यात आले होते. परंतु, त्यातील 9 लाख 29 हजार 27 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. यातील 25 लाख 36 हजार 140 लोकांची आरोग्य तपासणी केली. या तपासणीत संशयास्पद टीबीचे 5342 रुग्णांची नोंद करण्यात आली. यामध्ये 4108 रुग्णांच्या थुंकीची तपासणी करण्यात आली असून 2986 जणांची एक्स-रे काढण्यात आले आहेत. तर 1,076 जणांची CBNAAT चाचणी करण्यात आली.
सर्व वैद्यकीय चाचणीतून 172 जणांना टीबी असल्याचे समोर आले आहे. याशिवाय 1127 मुंबईकरांमध्ये कर्करोगाची लक्षण आढळून आली आहेत. तर कुष्ठरोगासाठी 25 लाख मुंबईकरांची स्क्रिनिंग करण्यात आली. ज्यापैकी 2362 संशयित कुष्ठरोगग्रस्त आढळले आहेत. या रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.
‘‘मुंबईसह राज्यभरातील असंसर्गजन्य आजारांच्या रूग्णांचा शोध घेण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली होती. यामध्ये 2 हजार 500 हून अधिक कर्मचारी 22 वॉर्डमध्ये आरोग्य अधिकारी तपासणी करण्यासाठी नेमण्यात आले होते. त्यानुसार आता 13 लाख लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून वैद्यकीय चाचणीत कुठलाही आजार असल्याचं आढळून आल्यास अशा रुग्णांना पुढील उपचारांसाठी आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले" ही माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
हेही वाचा - VIDEO: महाराष्ट्राच्या जनादेशाचे सविस्तर विश्लेषण...