मुंबई - कुर्ला ठक्कर बाप्पा येथील ६ महिन्यापूर्वी हरवलेल्या अल्पवयीन मुलीचा तपास लावण्यात कुर्ला नेहरूनगर पोलीस चालढकल करित असल्याने पीडितेचे वडील पांचाराम रिठाडीया यांनी रविवारी लोकल रेल्वेखाली आत्महत्या केली. मंगळवारी कुर्ला नेहरू नगर येथून पांचाराम यांची अंत्यात्रा काढण्यात आली. यात हजारो लोकांचा सहभाग होता. लोकांनी चेंबूर यथे रास्तारोको केल्यामुळे पोलीस आणि नागरिकांच्या चकमकीत पोलिसांच्या दोन गाड्या तोडल्या आहेत. पोलिसांनी ५० जणांना अटक केली आहे.
यावेळी मृत पांचाराम कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी जिनगर समाज रस्त्यावर उतरला. पोलीस सध्या संशयित तरुणांना अंत्यसंस्कार करून येतेवेळी ताब्यात घेत आहेत. चेंबूरच्या चेरीइ स्मशानभूमीमध्ये रिठाडीया यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयितांना अटक करायला सुरुवात केली आहे.
पोलिसांनी या स्थानिकांना मार्गातून बाजूला होण्यास सांगितले. परंतु, स्थानिक आक्रमक होऊन वाहनावर दगडफेक करण्यास सुरुवात केली असता स्थानिक शांतता भंग करीत असल्याने पोलिसांनी लाठीमार केला. यावेळी पोलिसांनी केलेल्या लाठीमारमध्ये दोन जण जखमी झाले आहेत.
चेंबूरच्या छगन पेट्रोल पंपासमोर वाहतूक पूर्ववत झाली असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस दल दिसत आहे. त्यामुळे परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. याठिकाणी रास्ता रोको करण्यात आला होता. जमाव रस्त्यातून उठत नसल्याने पोलिसांनी सौम्य लाठीमार करून रस्ता मोकळा केला आहे. यावेळी हजारो संख्येने जमाव जमा झाल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला होता. आता परिस्थिती पूर्वपदावर येत आहेत जमावाच्या दगडफेकीत मुंबई-पेन जाणाऱ्या बसच्या पाठीमागील काचेवर दगडफेक करण्यात आली. बस आता चेंबूर पोलीस ठाणे येथे उभी करण्यात आली आहे.