मुंबई - 'कोरोनो’ च्या पार्श्वभूमीवर आलेला यंदाचा गुढीपाडवा सर्वांनी घरात थांबूनच साजरा करावा तसेच कोणीही घराबाहेर पडू नये, रस्त्यावर येऊ नये आणि गर्दी टाळावी, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. पवार यांनी राज्यातील जनतेला गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छाही दिल्या.
हेही वाचा - पालिकेचे यश; कस्तुरबा रुग्णालयातील कोरोनाचे १२ रुग्ण झाले बरे
मराठी नववर्षानिमित्त दरवर्षी दिवसभर जल्लोष साजरा केला जात असे, यंदा मात्र कोरोना विषाणूमुळे शुकशुकाट पसरला आहे. मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंतरजिल्हा प्रवेश बंदीचा निर्णय घेतल्यामुळे आजाराचे गांभीर्य वाढले आहे.
"देशावरचा कोरोनाचा धोका पूर्णपणे संपल्यानंतर आनंद साजरा करण्यासाठी या गुढीपाडव्याचा उत्साह राखून ठेवावा, गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाची सुरुवात घरोघरी गुढ्या उभारुन, शोभायात्राचे आयोजन करून सामुहिक पद्धतीने करण्याची आपली परपरा आहे. यावेळीही घरोघरी गुढ्या उभारल्या जातील परंतु शोभायात्रांचे आयोजन व सामुहिक आयोजन टाळण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह, कौतुकास्पद आहे." असे उपमुख्यमंत्री म्हणाले.
नागरिकांनी यंदा 'कोरोना' विरोधात लढण्याची, जनजागृती करण्याची आणि ‘कोरोना’ला हरवण्याच्या संकल्पाची गुढी उभारावी असेही ते म्हणाले.