मुंबई - भाजप नेते किरीट सोमय्या यांना पोलिसांनी नीलमनगर भागातील निवासस्थानातून आज अटक केली. हा अत्यंत दुर्दैवी प्रकार आहे. हे सरकार मुघलशाही सरकार आहे, अशी टीका भाजपचे प्रवक्ते आणि आमदार राम कदम यांनी केली.
नियमांचे पालन करत माजी खासदार सोमय्या ठाण्यात जितेंद्र आव्हाडांनी ज्या व्यक्तीला मारहाण केली त्याला भेटण्यासाठी जात होते. मात्र, पोलिसांनी घरी येऊन त्यांना कुठे ही जाण्याचा मज्जाव केला आणि अटक केली. एखाद्या पीडित व्यक्तीला भेटण्यासाठी जात असताना अडवण्याचे कारण काय? असा प्रश्न राम कदम यांनी केला.
राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ज्या तरुणाला मारहाण केली, त्याला भेटण्यासाठी जात असल्याने पोलिसांनी मला अटक केली. मंगळवारी जितेंद्र आव्हाड यांनी ज्या अनंत करमुसे या तरुणाला मारहाण केली होती त्याच्या घरी जाण्यापासून मला रोखले, असा आरोप किरीट सोमैया यांनीही केला आहे.
बुधावारी सकाळी अनंत करमुसे याच्या घरी जाणार आहे, असे किरीट सोमय्या यांनी ट्विट केले होते. भाजपच्या नेत्यांनी या घटनेचा निषेध केला. आव्हाडांना मंत्रिमंडळातून काढून टाका अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील केली आहे.