मुंबई - गेल्या मार्च महिन्यापासून मुंबईत कोरोनाचा प्रसार आहे. या प्रसारादरम्यान किती मुंबईकरांना कोरोना होऊन गेला आणि त्याची त्यांना माहितीही नाही. याबाबत सर्वेक्षण करण्यासाठी सेरो सर्व्हे केला जातो. मुंबईत असा सेरो सर्व्हे तिसऱ्यांदा केला जात आहे. या सर्व्हेदरम्यान १२ हजार नागरिकांचे नमुने घेतले जाणार असून त्यापैकी ६ हजार नागरिकांचे नमुने आतापर्यंत गोळा करण्यात आल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
पहिल्या दोन सर्व्हेचा अहवाल -
मुंबईत २०२० मध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्यात एफ उत्तर (माटुंगा), आर उत्तर (दहिसर) आणि एम वेस्ट (चेंबूर) या तीन महानगरपालिका प्रभागांमध्ये सेरो सर्वेक्षण केले होते. यात ८ हजार ८७० पैकी एकूण ६ हजार ९३६ नमुने संकलित करण्यात आले होते. झोपडपट्टी आणि बिगर झोपडपट्टी परिसर परिसरातील ३ विभागांमध्ये सर्वसाधारण लोकसंख्येतून हे नमुने संकलित करण्यात आले होते. यात झोपडपट्टी भागांमध्ये सरासरी सुमारे ५७ टक्के व बिगर झोपडपट्टी भागांमध्ये सुमारे १६ टक्के अॅन्टीबॉडीज असल्याचे आढळून आले होते. तर आर/उत्तर दहिसर, एम/पश्चिम चेंबूर आणि एफ/उत्तर माटुंगा याच तीन विभागात सदर सर्वे सप्टेंबर अखेरीस करण्यात आला. या दुसऱ्या फेरीत ५ हजार ८४० नमुन्यांपैकी ५ हजार ३८४ नमूने संकलित करण्यात आले. दुसऱ्या फेरीतील सर्वेक्षणादरम्यान झोपडपट्टी भागांमध्ये सरासरी सुमारे ४५ टक्के व बिगर झोपडपट्टी भागांमध्ये सुमारे १८ टक्के आढळून आले आहे.
हेही वाचा - मनसुख हिरेन, खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणावरून विधानसभेत गोंधळ
तिसरा सर्व्हे -
मुंबईत पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागल्यावर पालिका प्रशासनाने तिसऱ्या सिरो सर्व्हेला सुरूवात केली आहे. १ मार्चपासून या सर्व्हेला सुरुवात झाली आहे. या सर्व्हेदरम्यान १२ हजार नागरिकांच्या रक्ताचे नमुने घेतले जाणार आहेत. त्यापैकी आतापर्यंत ६ हजार नमुने गोळा करण्यात आले आहेत. त्याचे निकाल चांगले आहेत. रुग्णांची वाढती संख्या आणि काही भागात रुग्ण कमी बाधित होण्याची संख्या याच्या संशोधनासाठी हा सेरो सर्व्हे उपयोगी ठरेल. दोन आठवड्यात परिपूर्ण अहवाल जाहिर केला जाईल, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.
हेही वाचा - सर्वच क्षेत्रांना फटका देणाऱ्या कोरोना महामारीला राज्यात १ वर्ष पूर्ण
पालिका स्वत: करतेय सर्व्हे -
मुंबईमध्ये ‘सार्स-कोविड २’ संसर्गाच्या अनुषंगाने, रक्त नमुने घेऊन करावयाचे सर्वेक्षण अर्थात सेरोलॉजिकल सर्वेलन्सचा उपक्रम नीती आयोग, बृहन्मुंबई महानगरपालिका, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (मुंबई) यांच्याद्वारे संयुक्तरित्या राबविण्यात आला. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून अभ्यास करताना कस्तुरबा रेणूजीवशास्त्र वैद्यकीय प्रयोगशाळा, ट्रांसलेशनल स्वास्थ्य विज्ञान एवं प्रौद्योगिकी संस्थान, ए.टी.ई. चंद्रा फाऊंडेशन आणि आय.डी.एफ.सी. इन्स्टिट्यूट हे देखील त्यामध्ये सहयोगी संस्था म्हणून सहभागी झाले होते. आता पालिकाच तिसरा सर्व्हे करत आहे. पालिकेच्या उप कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह आणि नायर रुग्णालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र प्रमुख डॉ. जयंती शास्त्री या सर्व्हेचे कामकाज हाताळत आहेत.