मुंबई - भाजप आणि शिवसेनेचे सरकार स्थापन होणार हे जवळपास निश्चित आहे. मुख्यमंत्री कोण होणार, तसेच मंत्री म्हणून कोणाची वर्णी लागणार याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तूळात आहे. देंवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाल्यास शिवसेनेच्या पदरात उपमुख्यमंत्रीपद पडू शकते. जर शिवसेना मुख्यमंत्रीपदावर अडून राहिली तर अडीच-अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रीपद वाटून घेतले जाण्याची दाट शक्यता आहे.
शिवसेनेकडून या नेत्यांना मिळू शकते संधी
मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेने आदित्य ठाकरे यांचेच नाव पुढे केले आहे. तेच मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री होवू शकतात. तर नुकत्याच झालेल्या निवडणूकीत जयदत्त क्षिरसागर, विजय शिवतारे आणि अर्जुन खोतकर हे मंत्री पराभूत झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांनी शिवसेनेकडून संधी दिली जावू शकते. मात्र, नव्या मंत्रीमंडळात सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम या ज्येष्ठ मंत्र्यांना डच्चू दिला जावू शकतो. त्यांच्या ऐवजी अनिल परब, उदय सामंत, भरत गोगावले, सुनिल प्रभू यांना संधी दिला जावू शकते. एकनाथ शिंदे आपले स्थान कायम ठेवतील. तर पक्षांतर केलेले भास्कर जाधव आणि अब्दुल सत्तार यांची वर्णीही लागू शकते.
सांगोला विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले शहाजीबापू पाटील यांचीही मंत्रीपदी वर्णी लागू शकते. तसेच कोरेगाव मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदेंना पराभूत केलेले महेश शिंदे यांचीही मंत्रीपदी वर्णी लागू शकते.
भाजपकडून यांना संधी मिळण्याची शक्यता
भाजपचे पंकजा मुंडे, परिणय फुके, अनिल बोंडे हे मंत्री पराभूत झाले आहेत. तर विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे यांचे पत्ते कट झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या जागी नव्या दमाच्या नेत्यांना मंत्रीमंडळात स्थान देण्याची तयारी भाजपने केली आहे. चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीष महाजन, आशिष शेलार यांचे मंत्रीमंडळातील स्थान निश्चित मानले जात आहे. मात्र, काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेल्या राधाकृष्ण विखे-पाटील यांना वगळले जाण्याची दाट शक्यता आहे. तर कोकणातून नितेश राणे यांना संधी दिली जावू शकते. मुख्यमंत्र्यांचे स्विय सहाय्यक आणि औसाचे आमदार अभिमन्यू पवार यांचाही समावेश होवू शकतो. तर राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झालेल्या गणेश नाईक यांचीही वर्णी मंत्रीमंडळात लागण्याची चर्चा आहे.
राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आणि केज विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या नमिता मुंदडा यांनासुद्धा मंत्रीमद दिले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले आणि सातारा जावळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनाही मंत्री म्हणून संधी मिळू शकते. माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांचीही वर्णी लागू शकते.