मुंबई : मुलांच्या परीक्षा संपल्यानंतर आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या आहेत. सुट्यात अनेकांना मामाच्या गावी जायचे असते. मुंबई शहर, आसपासच्या भागातील अनेक नागरिक उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे गावी फिरायला जाण्याचा बेत करतात. याच काळात घरफोड्या मोठ्या प्रमाणात होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे नागरिकांनी बाहेरगावी जाताना खबरदारी घ्याला हवी ते आज आपण जाणुन घेणार आहेत.
गावी जातांना सोशल माहिती टाकू नका : गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. उन्हाळी सुट्टी सुरू झाली की, घरफोड्यांच्या घटनात वाढ होतांना दिसत आहेत. मुंबईत गेल्या दोन महिन्यांत 946 तसेच 108 जबरी चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी जाणार असाल तर काही खबरदारी घेणे गरजेचे आहे. तुम्ही बाहेरगावी जातांना सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याची माहिती देणे टाळायला हवे. तुम्ही कुठे जाता आहेत? किती दिवसासाठी जाता आहेत याची माहिती सोशल मिडियावर टाकण्याचे टाळावे असे अवाहन पोलिसांनी केले आहे.
एकूण १२२ कोटीच्या मलमत्तेवर डल्ला : गेल्या वर्षभरात मुंबईत ६४ हजार ६५६ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यात दरोडा, किरकोळ चोरी, घरफोडी, चोरी, वाहनचोरी या गुन्ह्यांमध्ये एकूण १२२ कोटी ३१ लाख २४ हजार ४४७ रुपयांची मालमत्ता चोरीला गेली आहे. त्यापैकी 53 कोटी 16 लाख 74 हजार 593 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.
दोन महिन्यांत 6 हजार 175 गुन्हे दाखल : या वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यांत एकूण 6 हजार 175 गुन्हे दाखल झाले आहेत. या गुन्ह्यांमध्ये 225 घरफोडीचे गुन्हे दाखल झाले आहेत. या गुन्ह्यांमध्ये रात्रीच्या वेळी सर्वाधिक 187 घरफोड्यांचा समावेश आहे. गेल्या वर्षी मुंबई पोलिस दलाच्या रेकॉर्डमध्ये दोन महिन्यांत 242 घरफोडी, 642 चोरीच्या गुन्ह्यांची नोंद झाली होती. आता सुट्या सुरू झाल्यामुळे हजारो नागरिक आपल्या गावी, पर्यटनासाठी बाहेरगावी जाऊ लागले आहेत. याचा फायदा घेत चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे घरफोडी, वाहन चोरीच्या घटनात वाढ होतांना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
सोशल मीडियावरील माहिती घेत चोरी : ईटीव्हीशी बोलताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील म्हणाले की, मुंबई, नवी मुंबई, विरार, वसई पनवेल, उरण येथील शाळांना उन्हाळी सुट्ट्या लागल्या आहेत. लग्न, पर्यटन आदी कारणासांठी हजारो चाकरमानी गावाकडे रवाना झाले आहेत. काही हौशी नागरिक सुट्ट्यांसाठी बाहेरगावीही जात आहेत. त्यामुळे दरवर्षी मे महिन्यात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होतांना दिसते. नागरिकांची सोशल मीडियावरील माहिती घेऊन, काही चोरटे बंद घरांवर डल्ला मारत चोरी करतात त्यामुळे नागरिकांनी बोहेर गावी जातांना काळजी घेणे गरजेचे आहे.
बाहेर गावी जातांना अशी घ्या काळजी : सुट्यांमध्ये गावाबाहेर फिरायला जाताना नागरिकही पुरेशी काळजी घेत नाहीत. सुरक्षा रक्षक नसलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांमधील बंद घरांवर नागरिकांनी विशेष लक्ष द्यावे. नागरिकांनी घराबाहेर पडताना शेजाऱ्यांना माहिती देणे आवश्यक आहे. शक्यतो वाहने रस्त्यावर उभी करू नयेत. वाहने पार्किंगच्या ठिकाणी सुरक्षितपणे उभी करावीत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
सुरक्षेबाबत नागरिक उदासीन : नागरिकांनी सुरक्षेबाबत उदासीनता दाखविल्याने चोरट्यांना संधी मिळत आहे. अनेक नागरिक सुट्ट्यांमध्ये कुठे जात आहेत, याची माहितीही सोशल मीडियावर पोस्ट करतात. याची माहिती चोरांना मिळते. त्यानुसार सुटीच्या काळात घरफोड्या, दरोड्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होते. रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांच्या सुरक्षेसाठी कोणतीही सुरक्षा साधने वापरली जात नाहीत. त्यामुळे वाहनचोरीचे प्रमाण वाढले आहे. पोलिसांनी सुट्ट्यांच्या काळात शहरात गस्त वाढवावी अशी देखील काही नागरिकांनी पोलिसांना विनंती केली आहे.
सुरक्षेसाठी तंत्रज्ञानाचा करा वापर : सुटीच्या काळात घर बंद केल्यानंतर बाहेर पडताना नागरिकांनी आपले पैसे सेफ्टी लॉकरमध्ये किंवा बँकेत ठेवायला हवेत. मात्र, असे असतांना देखील अनेकजण आपले महागडे सोन्याचे दागिने घरीच ठेवून सुट्टीवर जातात. अशा वेळी त्यांच्यावर नजर ठेवून असलेल्या गुन्हेगाराकडून घरफोडी होण्याची शक्यता आहे. सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात बाजारात अनेक सुरक्षा उपकरणे आहेत. यात सीसीटीव्हीसह सेन्सर अलार्मचाही समावेश आहे. त्यासोबत घर बंद असताना घरात काही संशयास्पद हालचाल दिसल्यास मोबाईल फोनवर अलार्म वाजवता येतो. गेल्या काही दिवसांत पोलिसांनी अनेक गुन्हेगारांना अटक केली आहे. पोलिसांकडून गुन्हेगारांवर कारवाई होत असली तरी नागरिकांनी स्वत:ची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकारी रवींद्र पाटील यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - Chhagan Bhujbal : छगन भुजबळांच्या इशाऱ्यानंतर नाशिकमधील सात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या