मुंबई- या सरकारने अनेक अडचणींवर मात करत आपला एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. सरकारला अडचणीत आणण्यासाठी विरोधकांनी खूप प्रयत्न केले. पण त्यांना त्यात यश आले नाही. राज्यात आता कोणतेही ऑपरेेशन होणार नसून उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री राहतील तसेच सरकार आपली पाच वर्षे पूर्ण करेल, असे शिवसेना नेते आणि प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. आम्हीही जुनी थडगी उकरून काढली तर यांचे सांगडे बाहेर पडतील, असा इशारा राऊत यांनी दिला आहे.
आम्ही त्याला पुरून उरलो -
दरवर्षी दिवाळी जोरदार साजरी केली जाते. परंतु यावर्षी कोरोनाचे सावट असल्याने आजची दिवाळी फार वेगळ्या पद्धतीने साजरी होत आहे. मागच्या वर्षी याकाळात सत्तांतर झाले होते. मागीलवर्षी अनेक अघोरी प्रयोग विरोधकांनी केले; परंतु आम्ही त्याला पुरून उरलो. पुढील चार वर्षे महाराष्ट्रचा विकास करण्याकडे सरकारचे लक्ष असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या देखील याच भावना असल्याचे संजय राऊस म्हणाले.
जुनी थडगी उकरायचे बंद करा -
किरीट सोमैया यांच्याकडून शिवसेना व उद्धव ठाकरे यांच्यावर सतत आरोप केले जात आहेत. त्याबाबात बोलताना आम्ही बोलावे असे काही महान कार्य किरीट सोमैया यांनी केलेले नाही. त्यांचा पक्ष देखील त्यांच्याकडे गांर्भीयाने बघत नाही. जुनी थडगी उकरायचे किरीट सोमैया यांनी बंद करावे. आम्ही जर हे काम केले तर सगळे सांगाडे त्यांचे सापडतील, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.
ओबामांच्या वक्तव्याचे राजकारण -
अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा यांनी भारतीय नेत्यांवर केलेल्या टिकेबाबत बोलताना, ओबामा यांची मते काय माहिती नाही, पण भारतामधील नेत्यांबाबत अस बोलणे चुकीचे आहे. ओबामाने एक वक्तव्य करायचे आणि त्याचे राजकारण इथल्या नेत्यांनी करायचे, ते चुकीचे आहे. नरेंद्र मोदींबाबत ते जर हे बोलले, तरीही माझी भूमिका हीच असेल, असे राऊत म्हणाले.
शहीद जवानांसोबत दिवाळी -
राहुल गांधी खूप चांगले काम करत आहेत. तेजस्वी यादव यांनी ज्याप्रकारे बिहारमध्ये भूमिका पार पाडली त्यानुसार तेच खरे योद्धे आहेत. प्रत्येकवर्षी पंतप्रधान जवानांसोबत दिवाळी साजरी करतात हे चांगले आहे. परंतु काल जवान शहीद झाले आहेत, हे ही यांनी लक्षात घ्यायला हवे असे राऊत म्हणाले.
हेही वाचा- पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, भारताच्या प्रत्युत्तरादाखल कारवाईत सात ठार