मुंबई- गेली अनेक वर्षे रखडलेल्या भीमनगर येथील संरक्षण भिंतीचे काम पूर्ण करण्यात शिवसेना नगरसेवक सुरेश पाटील यांना यश आले आहे. मेट्रो १ च्या वेळी डोंगर खोदकामादरम्यान एमएमआरडीएने संरक्षण भिंत बांधली होती. मात्र, डोंगर भागातील आतील परिसरातील गटारातील पाणी संरक्षण भिंतीच्या छिद्रातून थेट रस्त्यावर येत असल्याने वाहन चालकांना त्रास व्हायचा. मात्र, आता संरक्षण भिंतीचे काम पूर्ण झाल्याने वाहन चालकांना दिलासा मिळणार आहे.
संरक्षण भिंतीचे काम आतील भागातून होणे अपेक्षित होते. मात्र, गेली अनेक वर्ष डोंगर भागातून येणारे पाणी, शौचालयाचे सांडपाणी संरक्षण भिंतीतील छिद्रातून थेट रस्त्यावर येत होते. तसेच, पावसाळ्यात या मार्गावर धबधब्याचे स्वरूप दिसायचे. शिवसेना नगरसेवक सुरेश पाटील यांनी हा प्रश्न कायमस्वरुपी निकाली लावण्यासाठी थेट संरक्षण भिंतीच्या आतील भागातून ५७ मीटर लांबीची संरक्षण भिंत उभारून नाल्याचे बांधकाम पूर्ण केले. या कामासाठी दीड कोटी खर्च झाल्याची माहिती नगरसेवक सुरेश पाटील यांनी दिली.
भीमनगर चौक ते घाटकोपर अंधेरी लिंक रोडवर बांधण्यात आलेल्या या संरक्षण भिंतीमुळे दगड कोसळण्याची भीती, तसेच अनेक वर्ष डोंगरातून रस्त्यावर पडणारे पाणी आता संरक्षण भिंतीच्या आतील भागातील नाल्यातून वाहून जाईल. त्यामुळे, मार्गावर होणारी वाहतूक कोंडी व दुर्गंधीचा प्रश्न सुटला असल्याचे नगरसेवक सुरेश पाटील म्हणाले.
हेही वाचा- 'मंदिरे सुरू करा म्हणायला तुम्हाला काय? जबाबदारी आमच्यावर आहे...'