मुंबई : अनेकजण वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करताना आढळून येतात. मात्र चक्क मुंबई सेंट्रल परिसरात एका पठ्ठ्याने सात जणांना गाडीवर घेऊन प्रवास केल्याने मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने दुचाकी चालकास अटक केली आहे. स्वतःसह सात लहान मुलांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या या व्यक्तीस या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वाहतूक पोलिसांनी अटक केली आहे.
लहानग्यांच्या जीवाशी खेळ - मुंबईत वाहतूक नियम पायदळी तुडवणाऱ्या आणि लहानग्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या एका दुचाकीस्वाराला पोलिसांनी अटक करून चांगलीच अद्दल घडवली आहे. दुचाकीवरून एकावेळी फक्त दोघे जण प्रवास करु शकतात. वाहतुकीचे नियम तोडून अनेकजण तिघे-तिघे एका दुचाकीवरून प्रवास करतानाही दिसतात. मात्र एका पठ्ठ्याने एक दोन नव्हे तर सात मुलांसह दुचाकी चालवून वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली केली आहे. अशाप्रकारे वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्या दुचाकीस्वाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने ही कारवाई केली आहे. ताडदेव पोलिसांनी संबंधित दुचाकीस्वाराला अटक केली आहे. त्याच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करत त्याला अटकही केली आहे.
नंबरवरून पोलिसांनी चालकाला शोधून काढले - स्वतःच्या चार मुलांना आणि शेजारच्या तीन मुलांना शाळेत सोडत असताना एका दुचाकीस्वाराने हा व्हिडीओ काढला आणि मुंबई पोलिसांना ट्वीट केला होता. त्यानंतर दुचाकीच्या नंबरवरून पोलिसांनी चालकाला शोधून काढले आणि त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अशाप्रकारे आपल्या आणि शेजारच्या मुलांना शाळेत नेण्यामागे त्याचा हेतू बहुदा चांगला असावा. मात्र, मार्ग चुकीचा होता. असे करणे म्हणजे सगळ्यांचाच जीव धोक्यात घालण्यासारखे होते. म्हणूनच ताडदेव पोलिसांनी ही कारवाई करत अटक केल्याची माहिती दिली आहे.
सिक्स सिटीरमधूनही होते अवैध वाहतूक - ग्रामीण भागात टमटममधून अशाप्रकारे सर्रास नियमांची पायमल्ली होताना दिसते. त्यावर अनेकदा कारवाई हो नसल्याचेही आढळून येते. आता या उदाहरणावरुन तरी ग्रामीण भागातही अशी अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई होईल का, असा प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे.