मुंबई - राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे पाच स्थरावर अनलॉकची प्रक्रिया आजपासून सुरु करण्यात आली आहे. मुंबईचा समावेश तिसऱ्या स्थरात असून, सरकारच्या नियमावलीची अंमलबजावणी आजपासून केली जाणार आहे. आजपासून मुंबईमधील दुकाने सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. लोकल रेल्वे, मॉल, थिएटर, नाट्यगृह बंद असणार आहे. तर, बेस्टच्या बसेस पूर्ण क्षमतेने चालवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
दुकाने सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू
राज्य सरकारच्या 'ब्रेक द चैन मोहिमे'अंतर्गत मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी परिपत्रक काढले आहे. राज्य सरकारने अनलॉकच्या प्रक्रियेत मुंबईचा लेव्हल 3 मध्ये समावेश केला आहे. त्याप्रमाणे सर्व नियम लागू असतील असे परिपत्रकात म्हटले आहे. लेव्हल 3 मधील दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळपासून सायंकाळी 4 वाजेपर्यंत चालू ठेवता येणार आहेत. शनिवार-रविवार दुकाने बंद राहणार आहेत. तसेच, सर्व दुकाने आस्थापनांनी कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहनही यामध्ये करण्यात आले आहे. दरम्यान, नियमांचे उल्लंघन केल्यास साथ नियंत्रण कायद्यानुसार कारवाई केली जाणार असल्याचेही परिपत्रकात नमूद केले आहे.
ट्रेन अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी
राज्य सरकारने काढलेल्या परिपत्रकानुसार लेव्हल 3 मधील शहर आणि जिल्ह्यांमध्ये लोकल ट्रेनमधून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसह महिलांना प्रवेश द्यावा, असे नमूद केले आहे. मात्र, महिलांना अशी सूट दिली जाणार नसल्याचे, पालिकेने स्पष्ट केले आहे. यामुळे आरोग्य कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यानांच लोकल ट्रेनने प्रवास करता येणार आहे.
काय सुरु, काय बंद
सर्व दुकाने सायंकाळी चार वाजेपर्यंत खुली राहण्यास मुभा आहे. तर, मॉल, थिएटर, नाट्यगृह बंद असतील. मैदाने आणि बगीचे सकाळी पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंत खुली ठेवण्यात येतील. महत्त्वाची खाजगी कार्यालय चार वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील. तर, शासकीय कार्यालय 50% उपस्थितीत सुरू करण्यास मुभा आहे. लग्नासाठी केवळ पन्नास लोकांच्या उपस्थितीतची परवानगी देण्यात आली आहे. तर, अंत्यविधीसाठी 20 लोकांना परवानगी, महत्त्वाच्या मिटिंगसाठी 50% उपस्थिती, केवळ बांधकामस्थळी राहून काम करणाऱ्या मजूर आणि कर्मचाऱ्यांना कामाची मुभा असेल. शेतीविषयक कामे चार वाजेपर्यंत करण्यास मुभा असेल. सायंकाळी पाच वाजेपर्यंत जमावबंदी असेल, तर पाच वाजेच्या नंतर संचारबंदी लागू होणार आहे. जिम, सलून आणि ब्युटी पार्लर सायंकाळी चार वाजेपर्यंत केवळ 50 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू राहील. सार्वजनिक वाहतूक आसन क्षमता नुसार सुरू राहील.
पॉझिटिव्ह रेटवर रेल्वे प्रवास
मुंबईतील लोकल सेवा ही केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू राहणार आहे. त्यामुळे मुंबईतली लोकलमधून सामान्य प्रवाशांना प्रवासाची मुभा दिली जाणार नाही. जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट हा तपासला जाईल आणि त्यानुसार त्या जिल्ह्याला त्या-त्या लेव्हल नुसार सूट दिली जाणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मुंबईचा पॉझिटिव्ह रेट झपाट्याने कमी झाला, तर लवकरच मुंबईकरांना लोकल सेवा खुली केली जाईल, असे आश्वासन विजय वडेट्टीवार यांच्याकडून देण्यात आले आहे.