मुंबई : सुमेर मर्चंटची एक मैत्रीण आणि मित्र यांना दादर येथील शिवाजी पार्क येथे सोडण्यासाठी सुमेर ताडदेव येथील त्याच्या राहत्या घरातून सहा वाजता निघाला. मित्र-मैत्रिणीला शिवाजी पार्क येथे सोडून आल्यानंतर घरी परतत असताना हा अपघात झाला. वरळी पोलिसांनी सुमेर मर्चंटसोबत त्याच्या कारमधून प्रवास करणाऱ्या मित्र आणि मैत्रिणींचे जबाबदेखील नोंदवले आहेत. अपघाताच्या आदल्या रात्री आरोपी सुमेरच्या ताडदेव येथील घरी पार्टी होती, त्यावेळी त्यांनी तेथे मद्यपान केले असल्याचे दोघांनीही पोलिसांना जबाबात सांगितले. त्याचप्रमाणे प्रत्यक्षदर्शीनीदेखील सुमेर मर्चंट याने मद्यपान केले असल्याचे सांगितले.
पोलिसांकडून सुमेरची वैद्यकीय तपासणी : सुमेरची वैद्यकीय तपासणी वरळी पोलिसांनी केली असून, ही वैद्यकीय तपासणी जे. जे. रुग्णालयात करण्यात आली असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. त्याचप्रमाणे सुमेर मर्चंटच्या रक्तात अल्कोहोलचे प्रमाण आहे की नाही हे एफएसएलच्या अहवाल आल्यानंतर स्पष्ट होणार आहे, असे पोलीससूत्रांनी सांगितले. त्यानंतर ड्रंक अँड ड्राईव्हचे कलम या गुन्ह्यात अॅड करण्यात येईल. तरी हा एफएसएलचा अहवाल येण्यास अजून काही दिवस लागतील, अशी माहिती वरळी पोलीस ठाण्यातील एका पोलिस अधिकाऱ्याने दिली. घटनास्थळी सीसीटीव्ही नव्हते. मात्र, घटनास्थळापासून काही अंतरावर असलेले सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले असून, सुमेर मर्चंट कार व्यवस्थित चालवताना दिसत आहे. पोलिसांच्या चौकशीत सुमेर मर्चंट यांने सांगितले की, अचानक पुढे ब्लाइंड स्पॉट आल्याने हा अपघात झाला.
राजलक्ष्मी या खासगी कंपनीत सीईओ : माटुंगामधील रहिवासी असलेल्या राजलक्ष्मी या एका खासगी तंत्रज्ञान कंपनीच्या सीईओ होत्या. फिटनेस फ्रीक म्हणूनही त्यांची ओळख होती. शिवाजी पार्कमधील जॉगर्स ग्रुपच्या त्या एक भाग होत्या. नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी त्या जाॅगिंगसाठी वरळी सीफेसवर गेल्या होत्या. साडेसहाच्या सुमारास वरळी डेअरी जवळ त्यांना भरधाव वेगाने आलेल्या टाटा नेक्साॅन ईलेक्ट्रीक कारने जोराची धडक दिली. ही धडक एवढी जोरात होती की, राजलक्ष्मी या काही अंतर लांब फेकल्या गेल्या. स्थानिकांकडून या अपघाताची माहिती मिळताच वरळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत राजलक्ष्मी यांना तात्काळ उपचारांसाठी पोद्दार रुग्णालयात दाखल केले. मात्र डाॅक्टारांनी त्यांना दाखलपूर्व मृत घोषित केले.
दुभाजकाला धडकून कारचा चक्काचूर : राजलक्ष्मी यांना धडक दिल्यानंतर कारची धडक दुभाजकाला होऊन कारचा चक्काचूर झाला. तसेच, अपघाताच कार चालक सुमेर हा जखमी झाला होता. स्थानिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या हवाली केले. प्राथमिक उपचार आणि वैद्यकीय चाचणीनंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करुन वरळी पोलिसांनी सुमेर याला अटक केली आहे. ताडदेवमधील रहिवासी असलेला सुमेर हा मित्र आणि मैत्रिणीला सोडायला गेला होता. तेथून भरधाव वेगाने परतत असताना त्याचे कारवरील नियंत्रण सुटले. कारची राजलक्ष्मी यांना मागून धडक बसली. त्यानंतर कार दुभाजकाला धडकल्याचे पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. सुमेर याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्याने मद्यसेवन केले होते का, हे अहवालानंतर स्पष्ट होईल असे पोलिसांनी सांगितले.