मुंबई - पीएम केअर फंडबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खुलासा करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी पत्रकार परिषद घेत पीएम केअर बाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खुलासा करावा व याबरोबर शेतकरी मागण्यांबाबत एक दिवसीय विशेष अधिवेशन पंतप्रधान मोदींनी बोलवावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
पीएम केअरबाबत खुलासा करा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम केअरबाबत व्यवस्थित खुलासा करावा. कारण हा पीएम केअर फंड पब्लिक चॅरिटेबलसाठी बनवण्यात आलेला असून या फंडाला सीएसआर घेण्याची मान्यता देण्यात आली होती. 27 मार्च ते 27 मेपर्यंत खासगी देणग्यांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये पीएम केअरमध्ये जमा झालेले आहेत. मात्र, याबाबतची माहिती सार्वजनिक करण्यात येत नसल्यामुळे याबद्दल स्वतः पंतप्रधानांनी खुलासा करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे
मोदींनी एक दिवसीय विशेष अधिवेशन घ्यावे
कृषी कायद्याच्या विरोधात नवी दिल्लीत हजारो शेतकरी आंदोलन करत असून आता 22 दिवस झाले आहेत. अद्यापही हे आंदोलन सुरूच आहे. दरम्यान एका शीख गुरूंनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. या कायद्याबाबात चर्चा करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी विशेष एक दिवसीय अधिवेशन बोलवावे, अशी मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात आलेली आहे.
हेही वाचा - नंग्या तलवारी घेऊन फिरणाऱ्या आरोपीला अटक; पोलीस हवालदार जखमी
हेही वाचा - शेतकरी आंदोलनात संत बाबा राम सिंह यांची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या