मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्लीचा कुठलाही दौरा नियोजित नसताना अचानक ते काल सहकुटुंब दिल्लीला रवाना झाले. आज त्यांनी संपूर्ण कुटुंबासहित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली. पंतप्रधानांनी इर्शाळवाडी दुर्घटनेबाबतही मुख्यमंत्र्यांकडे चौकशी केल्याचे समोर आले आहे.
शिंदे मुख्यमंत्रीपदावरून पायउतार? : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधानांची अचानक सहकुटुंब भेट घेतल्याने राज्यात विविध चर्चांना उधाण आले आहे. वास्तविक आजच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस आहे. अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्याचे भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर राज्यात विविध ठिकाणी लावण्यात आले आहेत. या बॅनरवरून चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होतील. एकनाथ शिदे यांच्या जागी अजित पवार यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागणार अशा चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहेत.
शिंदे यांच्या नेतृत्वात २०२४ निवडणूक : पंतप्रधान नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदे यांच्या भेटीने राज्यातील राजकारण तापू लागलेले आहे. यावर शिंदे गटाचे नेते, मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ही भेट केवळ सदिच्छा भेट असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याप्रसंगी बोलताना शंभूराज देसाई म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची केवळ सदिच्छा भेट घेतली आहे. या भेटीमागे कुठलेही राजकारण नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून अशा पद्धतीच्या वावड्या विरोधकांकडून उठवण्यात येत आहेत. शिंदे सरकार लवकरच पडणार, ते जास्त दिवस टिकणार नाही, असे विरोधक म्हणत होते. मात्र, शिंदे सरकारने एका वर्षापेक्षा जास्त कालावधी पूर्ण केला आहे. येणाऱ्या २०२४ च्या विधानसभेच्या निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढवल्या जातील, असेही शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे.
का रंगल्यात चर्चा : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार पूर्णतः स्थिर असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार अचानक सत्तेत सहभागी झाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. अशात शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवार यांच्यासह नऊ नेत्यांना मंत्रिपदाची शपथ दिल्याने राज्यातील राजकारणात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच एनडीएच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीमध्ये गेले. बैठकीनंतर अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर स्वतंत्र बैठक घेतल्याने शिंदे गटात अस्वस्थतेचे वातावरण आहे. अशात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याने राज्यातील सत्ताबदलाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.