मुंबई - देशातील वैद्यकीय प्रवेशासाठी मागील महिन्यात नॅशनल टेस्टींग एजन्सीकडून नीट परीक्षा घेण्यात आली होती. या सामायिक प्रवेश परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांची यादी राज्याला मिळाली आहे. राज्यात वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेला सुरूवात झाली आहे.
या प्रवेशाची पहिली गुणवत्तायादी ही १५ नाव्हेंबर रोजी जारी केली जाणार आहे. त्यासाठीची प्रवेश प्रक्रिया २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत पूर्ण केली जाईल. राज्य सीईटी सेलकडून अशी माहिती देण्यात आली. अखिल भारतीय स्तरावर नीटमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठीची ही प्रवेश प्रक्रिया आहे. यात वैद्यकीयच्या एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीयुएमएस, बीपीटीएच, बीएएसएलपी, बीपी ॲन्ड ओ, बी.एस्सी नर्सिंग अशा अभ्यासक्रमांच्या प्रवेशांचा समावेश आहे.
ऑनलाईन नोंदणीला सुरूवात
या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना माहिती पुस्तिका प्रसिद्ध करण्यात आली आहे. ती सीईटीच्या www.mahacet.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच उपलब्ध जागांची यादीही आज जाहीर करण्यात आली. त्यानुसार विद्यार्थ्यांना आपली ऑनलाईन नोंदणी आजपासून करता येईल.
पहिली गुणवत्ता यादी १५ नोव्हेंबर रोजी
एमबीबीएसची पहिली तात्पुरती यादी ही १३ नोव्हेंबर रोजी जाहीर केली जाईल. प्रवेशाची मुख्य गुणवत्ता यादी ही १५ नोव्हेंबर रोजी जाहीर केली जाणार आहे. तर पहिल्या यादीतील प्रवेशानंतर रिक्त राहिलेल्या जागांसाठी दुसरी गुणवत्ता यादी आणि त्याचा कार्यक्रम जाहीर केला जाणार, अशी माहिती सीईटी सेलकडून देण्यात आली.